खा. निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी बंडूशेठ साबळे काळाच्या पडद्याआड !

 जनसेवेचा भावनिक चेहरा हरपला…!

खा. निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी बंडूशेठ साबळे काळाच्या पडद्याआड !

 सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात शोककळा!


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

रुई छत्रपती गावच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम असलेले बंडूशेठ साबळे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण पारनेर तालुका शोकमग्न झाला आहे. खासदार निलेश लंके यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या बंडूशेठ साबळे यांनी सोमवारी पहाटे पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने लंके प्रतिष्ठान परिवारावर दुःखाचे सावट पसरले असून रुई छत्रपती गावाने एक धडाडीचे नेतृत्व गमावले आहे.

सामान्य कुटुंबातून संघर्ष करत रोजगाराच्या शोधात चाकण या औद्योगिक वसाहतीत गेलेल्या बंडूशेठ साबळे यांनी आपल्या प्रामाणिकपणा, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचे स्वतंत्र विश्व उभे केले. आर्थिक प्रगती करत असतानाही त्यांनी गावाशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. उलट गावातील प्रत्येक सुख-दुःखात, सामाजिक उपक्रमात आणि गरजूंच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेत राहिले.

“माणूस मोठा पैशाने नव्हे तर माणुसकीने होतो,” हे वाक्य जणू त्यांच्या जीवनातूनच साकार झाले होते. कुठलाही गाजावाजा न करता गरजूंना आर्थिक मदत, सामाजिक आधार आणि भावनिक साथ देणारा हा चेहरा समाजमनात कायम स्मरणात राहणार आहे.

खा. निलेश लंके यांच्या सामाजिक कार्यावर प्रचंड प्रेम करणारे बंडूशेठ साबळे हे प्रत्येक उपक्रमात स्वतःहून पुढे राहत. लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक अभियानांना त्यांनी मुक्तहस्ते सहकार्य केले. त्यांच्या सहचारिणी विजयाताई बंडूजी साबळे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करून रुई छत्रपती गावच्या सरपंचपदी विराजमान करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे लंके प्रतिष्ठान परिवारातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि सामान्य माणसाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, खासदार निलेश लंके दिल्ली येथे कार्यालयीन कामाकाजा साठी गेले असताना ही दुःखद घटना घडली. ही बातमी समजताच त्यांनी आपल्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. “एक जिवाभावाचा साथीदार हरपला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

बंडूशेठ साबळे हे केवळ राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर धार्मिक परंपरा जपणारे वारकरीही होते. आषाढी वारीत ते सपत्नीक पंधरा दिवस सहभागी होत वारकरी संप्रदायातील भक्तीचा आनंद घेत असत. बंडू साबळे यांनी गेल्या काही महिन्यात देशातील विविध देवस्थानांचा दौरा केलेला होता .  अध्यात्मिक समाधान मिळवणारे हे युवा नेतृत्व अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने धार्मिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे.


चौकट :

 “स्वप्न राहिले अधुरे…”

खा. निलेश लंके यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजकारणात सक्रिय झालेल्या बंडूशेठ साबळे यांचे सुपा गणातून पंचायत समिती निवडणूक लढवण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. गेल्या पाच वर्षांपासून सुपा गणातील प्रत्येक सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक कार्यक्रमात ते सातत्याने सहभागी होत होते.

“साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य होऊन जनतेची सेवा करायची,” ही त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र नियतीने वेगळाच निर्णय घेतल्याने त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

बंडूशेठ साबळे यांच्या जाण्याने पारनेर तालुक्याने एक कर्तृत्ववान, दिलदार आणि जनसामान्यांशी नाळ जपणारा युवा चेहरा गमावला असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments