शिरापूर गावची वाघीन सौ.तृप्ती दाते यांची नवी मुंबई पोलीस दलात निवड !

 कुटुंब, कर्तव्य आणि करिअरचा समतोल साधत तृप्ती दाते यांची यशस्वी झेप !


शिरापूर गावची वाघीन सौ.तृप्ती दाते यांची नवी मुंबई पोलीस दलात निवड !


खासदार निलेश लंके यांच्याकडून तृप्ती दाते यांच्या यशाचे कौतुक; संघर्षातून घडलेल्या कर्तृत्वाला सलाम !



पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

नवी मुंबई पोलीस दलात निवड होऊन शिरापूर गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या सौ. तृप्ती संतोष (बंटी) दाते यांच्या यशाचा गौरव सर्व स्तरांतून होत आहे. घर, कुटुंब आणि स्पर्धा परीक्षेचा ताळमेळ साधत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर यशाचे शिखर सर केले असून त्यांच्या या कर्तृत्वाने ग्रामीण भागातील असंख्य महिलांसमोर प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.


या यशाबद्दल खासदार निलेश लंके यांनी तृप्ती दाते यांचे विशेष अभिनंदन करत भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी, "प्रशासकीय सेवेतील पद हे केवळ अधिकाराचे प्रतीक नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि मदत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या पदाचा लाभ गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांना मिळेल यासाठी संवेदनशीलतेने कार्य करा. सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल अशी सेवा आपल्या हातून घडो," अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या.


तृप्ती दाते यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासात सातत्य, संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवला. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचे मोलाचे सहकार्य लाभले असून विशेषतः पती संतोष (बंटी) दाते यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांचा संघर्ष अधिक सक्षम झाला.


शिरापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक संतोष (बंटी) दाते यांच्या कुटुंबातील तृप्ती दाते यांच्या निवडीमुळे दाते परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाचे पारनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


तृप्ती दाते यांचे हे यश केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण भागातील महिला शक्ती, कष्ट, ध्येयवेड आणि आत्मविश्वासाचा विजय आहे. त्यांच्या यशोगाथेतून संघर्षाला सामर्थ्यात आणि स्वप्नांना वास्तवात बदलण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments