शेतकऱ्यांच्या विश्वासाला बळ ,हंगा सेवा सहकारी संस्थेकडून ७.०२ कोटींचे विक्रमी कर्ज वितरण !

 शेतकऱ्यांच्या विश्वासाला बळ ,हंगा सेवा सहकारी संस्थेकडून ७.०२ कोटींचे विक्रमी कर्ज वितरण !

९२% वसुलीचा आदर्श, पारदर्शक कारभारामुळे संस्थेचा ठसा; खासदार डॉ. निलेश लंके यांच्याकडून कौतुकाची थाप !


प्रतिनिधी :श्रीकांत चौरे पारनेर

            पारनेर तालुक्यातील हंगा येथील श्री कृष्ण हंगा/मुंगशी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेने सन २०२६-२०२७ च्या खरीप हंगामासाठी कर्ज वितरणात उल्लेखनीय कामगिरी करत शेतकऱ्यांच्या विश्वासाला बळ दिले आहे.

               अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री. लाळगे साहेब तसेच शाखाधिकारी श्री. पठारे साहेब यांच्या हस्ते संस्थेच्या सभासदांचे KCC (किसान क्रेडिट कार्ड) खात्यात कर्ज रक्कम जमा करण्यात आली.

              संस्थेच्या एकूण १२४५ कर्जदार सभासदांपैकी ७७५ सभासदांना तब्बल ७ कोटी ०२ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून, यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाले आहे.

              विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षात संस्थेने ९२ टक्के कर्ज वसुली साध्य करून शिस्तबद्ध आणि जबाबदार व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. या पारदर्शक व कार्यक्षम कारभाराबद्दल नगर दक्षिणचे खासदार डॉ. निलेश लंके यांनी संस्थेच्या कर्मचारीवृंद व संचालक मंडळाचे विशेष कौतुक केले.

                संस्थेचे चेअरमन सुदाम भाऊ थोरात, व्हा. चेअरमन किशोर मोहन वाघोले तसेच सर्व संचालक मंडळाने बँकेच्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक . आभार मानले.

            याचबरोबर, संस्थेचे सचिव चंदन भाऊसाहेब व सहसचिव भाऊ मोकाते यांच्या कार्यतत्पर सेवेमुळे संस्थेच्या कामकाजात गती आणि विश्वासार्हता निर्माण झाली आहे. संस्थेचे मार्गदर्शक भाऊ साठे यांनी सचिव, संचालक मंडळ तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त केले.

           एकूणच, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास घेत पारदर्शकता, शिस्त आणि विश्वास यांच्या जोरावर हंगा सेवा सहकारी संस्थेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याचा आदर्श निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments