समतेच्या ज्योतीत पारनेर उजळले; सर्वधर्मीय एकोप्याने फुले जयंती साजरी !

राजकारणाच्या पलीकडे एकतेचा उत्सव; पारनेरमध्ये महात्मा फुले विचारांना सर्वधर्मीय सलाम !





पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

         क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पारनेर येथे सर्वधर्मीय व सर्वपक्षीय एकोप्याचे अभूतपूर्व दर्शन घडले. शनिवारी पार पडलेल्या या उपक्रमात राजकीय व सामाजिक भेद बाजूला ठेवत शहरातील नागरिकांनी एकत्र येत समता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात पारनेरचे ग्रामदैवत रोकडेश्वर हनुमान मंदिर येथे अभिवादन करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण तसेच नुरशाबाबा पिर येथे चादर समर्पित करून करण्यात आली. या कृतीतून सर्वधर्मसमभावाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

          शहरातील गायकवाड, व्यवहारे, चौरे, विधाटे, नाईक, लोंढे आदींसह माळी समाज बांधवांनी पुढाकार घेत, तालुका व जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.



         या प्रसंगी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यासह पारनेर शहर, तालुका व जिल्ह्यातील विविध पक्षांची विविध संघटनेचे व विविध धर्माचे, विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,पारनेर नगरपंचायत चे आजी माजी नगरसेवक सेवा सोसायटीची चेअरमन प्रतिष्ठित मान्यवर व यशस्वीरित्या नियोजन करणारे माळी समाज बांधवांचे सर्व युवा सहकारी व पदाधिकाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांचा जागर करत समाजाला एकतेचा संदेश दिला.



संपूर्ण कार्यक्रम सौहार्द, समता व बंधुभावाच्या वातावरणात पार पडला. ही केवळ जयंती नव्हे, तर समतेच्या विचारांची पुनर्स्मृती ठरली .जिथे भेद मिटले, मनं जुळली आणि मानवतेचा खरा उत्सव साजरा झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन चौरे यांनी केले, तर आभार शाहीर मामा गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments