श्री.गंगाराम बेलकर सभापती तर श्री.संदीप सालके यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड !

 पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनुभव व कार्यक्षम नेतृत्वाची सांगड !

श्री.गंगाराम बेलकर सभापती तर श्री.संदीप सालके यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड !





पारनेर (प्रतिनिधी) : श्रीकांत चौरे

            पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीतील पेच अखेर सुटत,ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व असलेल्या गंगाराम बेलकर यांची सभापतीपदी तर युवा व निष्ठावान कार्यकर्ते संदीप सालके यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच बाजार समिती परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

        माजी सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास जाधव यांनी कामकाज पाहिले. यावेळी खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

         श्री.गंगाराम बेलकर हे तालुक्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली असून प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या पत्नी सौ.अरुणा बेलकर यांनीही पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे स्थिर आणि अनुभवी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.

         उपसभापतीपदी निवड झालेले संदीप सालके हे खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे विश्वासू व जुने सहकारी म्हणून परिचित आहेत. एका निष्ठावान युवा कार्यकर्त्याला संधी देत तरुण नेतृत्वाला चालना देण्याचा संदेश या निवडीतून अधोरेखित झाला आहे.

          या निवडीपूर्वी खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत बेलकर आणि सालके यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.सुमारे तीन वर्षांपूर्वी खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत सत्तांतर झाले होते. सुरुवातीला बाबासाहेब तरटे व बापू शिर्के यांना संधी देण्यात आली, त्यानंतर किसनराव रासकर व किसनराव सुपेकर यांनी कार्यभार सांभाळला. आता तिसऱ्या टप्प्यात बेलकर–सालके यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह व्यक्त केला. यावेळी माजी सभापती, पदाधिकारी, संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण घडामोड !

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.      

       बेलकर व सालके यांच्या नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होऊन स्थानिक राजकीय समीकरणांना नवे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्धता !

“खासदार निलेश लंके यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. बाजार समितीच्या सर्व संचालकांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करू,” अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभापती गंगाराम बेलकर व उपसभापती संदीप सालके यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments