पारखपद अनुभव सिद्धांत लेखक आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे

 🌼 अनुभव सिद्धांत 🌼


✍️
लेखक-आत्मज्ञानी गणपतबाबा चौरे


📖 अध्याय १ ला

अनाम अविनाश अढळ ।।

अव्यक्त परात्पर निर्मळ ।

झीर अनाम केवळ ।।

स्वयंम स्वरूप ।।१।।


किती वर्णावा तुझा महिमा ।।

वर्णिता झाली सीमा ।

अमर्याद अखंड रामा ।।

विदेही पुरुषा ।।२।।


अनंत ब्रह्मांड घडामोड करी ।

करुनी अकर्ता निर्धारी ।।

सत्यवचनी अनाम हरी ।।

अखंड नटलासी ।।३।।


धन्य धन्य तू सद्गुरुराव ।

सूत्रधारी निर्भय देव ।।

अमूप दाविसी ठाव ।।

वर्णावे किती ।।४।।


श्रुती स्मृती वर्णिता थकल्या ।

वेद मुखी वाचा बसल्या ।

शब्द खुंटला, कल्पना मेल्या ।

स्वयंम स्वरूप वर्णिता ।।५।।


सत्यवचनी प्रकाश उमटून ।।

दोहींच्या संधीत उठले भान ।।

उठली कल्पना ब्रह्मांड रचून ।।

आदि शून्य ब्रह्मांड आधीचे ।।६।।


आदि शून्य ब्रह्मांड आधीचे ।।

पक्के देह प्रथम हंसाचे ।।

दया, क्षमा, सत्व, धीर रुचे ।।

विचार पाचवा ।।७।।


तत्त्वाचे हंस सुख घेई ।।

उठला आनंद, भान नाही ।

मूळ प्रकृती काया झाई ।।

विसरला देह मूळचा ।।८।।


कामांत भूलला, दुसरा झाला ।।

पक्का असता कच्चा ठरला ।

कल्पून कल्पनेत गढला ।

दृष्टा बनला आपण ।।९।।


दुसरी इच्छा नारी अवतरली ।।

एकाचे अनंत व्हावे इच्छा वरली ।

प्रमाता-प्रमेय-प्रमाण वाहिली ।।

ज्ञानतत्त्व अहंकार ।।१०।।


परा, पश्यंती, मध्यमा अगाध ।।

ॐ उठला शब्द ।

सोहम एकच नाद ।।

मूळ शब्दाची रचना ।।११।।


दोन्ही मधून निघाले वचन ।।

बुद्धीचा प्रकाश महत्तत्त्व बनून ।

हेच वेदांचे मूळ स्थान ।।

शब्द बीज अवघे ।।१२।।


महत्तत्त्वांच्या आंत ओंकार ।।

अकार, उकार, मकार, तुरीयाकार ।

बिंब साक्षी निराकार ।।

गायत्री मंत्र हा ।।१३।।


चार मात्रा देह चार ।।

विराट स्वरूप झाले तयार ।

चित्त अंतर्यामी हिरण्य थोर ।।

विराट देह चौथा ।।१४।।


अनंत शिरकर चरण ।।

तेहतीस स्वर्ग, चौदा भुवन ।

सप्त पुरी, लोक तीन जाण ।।

सद्गुरुने रचिले ।।१५।।


शुद्ध सत्त्वगुण योगमाया ।।

तिने सत्त्वगुण रचिला पाया ।

सत्त्वगुणांच्या आंत रजोगुण राया ।।

रजाचा तमोगुण ।।१६।।


तमोगुणांच्या आत आकाश ।।

आकाशाच्या आत वायू वसे ।

वायूच्या आत तेज सरसे ।।

तेजात सूर्य झाला ।।१७।।


सूर्याची उष्णता फाकली पूर्ण ।।

तयापासून झाले जीवन ।

तया जीवनात निधान ।।

पृथ्वी तत्त्व झाले ।।१८।।


शब्द व्यापला घडल्या गोष्टी ।।

यांस म्हणती ईश्वर सृष्टी ।

सद्गुरुची अगाध दृष्टी ।।

नकळे पार गुरुचा ।।१९।।


अविनाश हा सद्गुरु ।।

अमर स्तवन गुरुचे करू ।

गुरु उतरवील पैल पारू ।।

प्रताप सद्गुरुचा ।।२०।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।।

प्रथम अध्याय गोड हा ।।२१।।

(समाप्त)


📖 अध्याय २ रा

दृष्टा विश्व ईश्वर ।

त्याचा प्रतिबिंब पुरुष नर ।

तो ज्योतीरूपी साचार ।

त्वंपद म्हणविती ।।१।।


तो पुरुष आला पृथ्वीवरी ।

त्याची लीला अगाध भारी ।।२।।


सर्पट नारी जीव भूमीवरती ।

जीवन बीज वसे उत्पत्ती ।

पती-छाया हवा नारी ।

दोघांपासून जग अवधारी ।

उत्पत्ती जाहली पुरुषाचा हाक, अवघे मानिती ।

चारी खाणी दोरी खेळवी ।।३।।


शब्द व्यापला सर्व ठायी ।

शब्द झाला देह अंतराई ।

शब्द चार देह अनुभव येई ।

वाणी रूप शब्द ।।४।।


महाकारण, सूक्ष्म, स्थूल ।

देह चौथा जड नेम पूर्ण ।

तिहींला साक्षी जीव तो जाण ।

महाकारण देह हा ।।५।।


स्थूल देह आठ हातांचा ।

आकार, मात्रा लाल रंग त्याचा ।

तू साक्षी स्थूल देहाचा ।

स्थूल तू नव्हे ।।६।।


अस्थी, मांस, रोम, शिरा, चर्म ।

रक्त, मूत्र, मेद, मदन, कर्म ।

चलन-वलन, धावन, आकुंचन, विस्तार धर्म ।

तीन तत्त्वांत ।।७।।


क्षुधा, तृषा, आळस, जांभई, निद्रा ।

राग, द्वेष, चिंता, लोभ, भद्रा ।

पंचविसावा स्थूल देह हा धरा ।

याचा साक्षी तूच ।।८।।


सूक्ष्म देह स्थूलाच्या आंत ।

अंगुष्ठ प्रमाण, रंग श्वेत ।

उकार कंठी राहात ।

सूक्ष्म देह तू नाही ।।९।।


अंतःकरण, चित्त, मन, बुद्धी ।

श्रवण, चक्षु, प्राण, वाचा, गुदी ।

याचा साक्षी तू हंसा ।।१०।।


अपान, व्यान, उदान, समान, प्राण ।

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध जाण ।

असे सूक्ष्माचे पंचविस तत्त्व गहन ।

साक्षी तयाचा प्रत्यक्ष ।।११।।


कारण देह हृदयात वसे ।

नीलवर्ण महाकारण त्यात दिसे ।

सुषुप्ती अवस्था त्यात वसे ।

आनंद भोगी ।।१२।।


द्रव्यशक्ती, तमोगुण, प्राज्ञ अभिमानी ।

कारण देह आठ तत्त्वांनी ।

ते तू नव्हे जाणुनी ।

वेगळा आत्मा ।।१३।।


तुरीय अवस्था मस्तकी स्थान ।

परावाचा आनंद ज्ञान ।

इच्छा शक्ती शुद्ध सत्त्वगुण ।

महाकारण देह असा ।।१४।।


मसूर प्रमाण ताजवा रंग ।

चारींचा साक्षी तू वेगळा चांग ।

जीव-शिवाचे अंग ।

तू कसा वेगळा ।।१५।।


पाचवा सहस्त्रदलावरी ।

शुद्ध संन्यासी दशवे द्वारी ।

अखंड सुख मूळ माहेरी ।

रेणु पाठी पोटी ।।१६।।


पाचवा देह पिंड-ब्रह्मांडी ।

तेहतीस स्वर्ग आणि नवखंडी ।

जन्म-मरण फुटली हांडी ।

जीवदशेची ।।१७।।


ब्रह्म, ईश्वर, कूटस्थ, जीव ।

असे चार चैतन्य नाव ।

या रीती कल्पनेचा ठाव ।

चित्रपटावरी ।।१८।।


असिपद ब्रह्म सामान्य ।

त्यात दृष्टा राहे अन्य ।

एकाचे अनेक चाले वाहन ।

ईश्वरी रचना ।।१९।।


तयाचा प्रतिबिंब कूटस्थ हृदयात ।

कूटस्थाचा प्रतिबिंब जीव खेळत ।

वासना-अविद्या दर्पणात ।

भोगी योनी ।।२०।।


धन्य सद्गुरुची करणी ।

माझी मजजवळ ओळख पटवूनी ।

पिंड-ब्रह्मांड केली मोजणी ।

अनाम देश सुखाचा ।।२१।।


अनुभव सिद्धांत अद्वैत रचना ।

द्वैतभाव मिथ्या कल्पना ।

अमळ देशाचा सद्गुरु राणा ।

मिथ्या काम उडविला ।।२२।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।

द्वितीय अध्याय गोड हा ।।२३।।

(समाप्त)


📖 अध्याय ३ रा

नीःअक्षर सत्य स्वरूप सद्गुरु ।

जीवदशेस न लागे पारु ।

निवाडा करून दाखविला ।

अज्ञानाचा फोडिला भुजंग ।।१।।

तिन्ही पदाचा स्वयं स्वरूप ।।२।।

ब्रह्म व्याले प्रकृतीच्या द्वारा ।

पक्क्या तत्त्वांत हंसा घेई घेरा ।

मन आनंदाचा भवरा ।

त्यांत हंसा भूलला ।।३।।


झाला दृष्टा तत्पर अक्षर ।

त्याने अनंत विश्वरूप केले तयार ।

तयापासून शब्द ओंकार ।

बीज जनतेचे ।।४।।


सच्चिदानंद निर्गुण साक्षी ।

दृश्य दर्पणात स्वयं स्वरूप लक्षी ।

एकाचे अनंत प्रत्यक्षी ।

आपणाचि जाहला ।।५।।


आला ब्रह्मांडाचा हरिधनी ।

ब्रह्मांडावरती जग भासवुनी ।

जग खेळवी सूत्र हालवुनी ।

संसारकर्ता झाला ।।६।।


तत्पदाचा प्रतिबिंब जीव ।

घरात कूटस्थ पडले नाव ।

तिहींचा साक्षी चौथा शिव ।

मूळ ठिकाण चुकला ।।७।।


अविद्या कल्पनेची मात ।

बोजा वाहे दिनरात ।

जन्म-मरणाच्या फेऱ्यात ।

दुःखी झाला जीव ।।८।।


नामरूप मायेचे खोट ।

अस्ति-भाति-प्रिय चैतन्य मोठ ।

चारी देहाचा साक्षी कैवल्य पेठ ।

सद्गुरुनी दाखविली ।।९।।


त्वंपद क्षीर निरसून ।

तत्पद अत्रर देवमुनि ।

असिपद दोहींत जैसे पाणी ।

आकाशवत न्याय हा ।।१०।।


तिही पदात व्यापून वेगळा सद्गुरु ।

अविनाश अमूप लागे ना पारु ।

निश्चळ अव्यक्त निर्धारु ।

स्वयं स्वरूप गुरुचे ।।११।।


जसे आकाश सर्वां ठायी ।

घट-मठ व्यापिले रिता ठाव नाही ।

दृष्टा-दृश्य गेले, दर्शन राहिले ।

पारख प्रकाश ।।१२।।


गुरुनी आपल्या सारिखे केले ।

गुरु माझ्यात, मी गुरुत, दुजेपण गेले ।

शून्य शिखरावर बसविले ।

अनाम देशात ।।१३।।


अनाम देश अमृताने भरला ।

मेघ नसता पर्जन्य फुटला ।

गुरु दाही दिशा कोंदाटला ।

झीण अलक्ष ।।१४।।


पारख पद सद्गुरु अविनाश ।

कोटी सूर्यांचा पडला प्रकाश ।

पारखी पारख एकरस ।

भिन्न भास नाही ।।१५।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।

तृतीय अध्याय गोड हा ।।१६।।

(समाप्त)


📖 अध्याय ४ था

सद्गुरु चरणी मन ठेवावे ।

निवांत आसन चित्त एके ठायी ।

त्रिकुट भुवनी समाधिस्त होई ।

देश अनाम सद्गुरुचा ।।१।।


बारापळ दृष्टी भृकुटी ।

एक धारणा देखणी पुष्टी ।

बारा धारणा एकवटी ।

चित्त लावी एक ।।२।।


बारा ध्यान एक समाधी ।

सुषुम्ना प्रकाश प्रभा सिद्धी ।

सहस्त्रदळावर रेणूची गर्दी ।

अंत नाही रेणूसी ।।३।।


ध्येय ध्याता ध्यान संपुर्ण ।

एकचि शोधले गगन ।

सूर्यमंडळ तारांगण ।

अंतर गर्भातून निघती ज्वाळा ।।४।।


अम्मीची लाट एक सेकंदात ।

नऊ लाख मैल चालत ।

अडीच कोटी मैलांपर्यंत ।

ग्रह तारे नाही ।।५।।


दोन अब्ज मैल तेथोनी पुढे ।

मृत्युलोक म्हणती रोकडे ।

ग्रहतारे घेती फेरे मारिती वेढे ।

मृत्युलोक असा हा ।।६।।


स्वर्ग, मृत्यू, पाताळ ।

तिन्ही मिळुनी सूर्यमंडळ ।

विराट स्वरूपाच्या पुढे अढळ ।

चेंडू जैसा ।।७।।


असे अनंत सूर्यमंडळ ।

विराट स्वरूपा भोवती भाळ ।

योगमायेचा पट्टा निर्मळ ।

प्रभा विश्वाची ।।८।।


विराट स्वरूप महत्तत्त्वाच्या आंत शोभा ।

असे अनंत विराट रूप उगम गाभा ।

सच्चिदानंद निर्गुण मध्ये उभा ।

सूत्र खेळवी ।।९।।


असे अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी ।

अनाम अविनाश गुरु निर्धारी ।

अपार पार नसे तिळभरी ।

शुद्ध चैतन्य गुरु ।।१०।।


पाहता पाहणे हारपले ।

नीःअक्षर एक संचले ।

दुजेपण नाही उरले ।

फाटला पडदा ।।११।।


मेघश्याम मुक्तखाणी ।

कोटी सूर्य प्रकाश न माये गगनी ।

चित्त स्वरूप पवित्र धनी ।

नीलवर्ण निर्लेप ।।१२।।


चारी मुद्रा देखणीचा भास ।

अलक्ष मुद्रा अनिर्देश ।

दर्शन गुरुचे अजय सरस ।

दृष्टा-दृश्य अनुमान सरला ।।१३।।


आदि, मध्य, अंती अवघा गुरु एक ।

शुद्ध घनश्याम नसे कलंक ।

डोळा भरियेला स्वरूप एक ।

अरूपरूप सद्गुरु ।।१४।।


जैसा घडा समुद्रात ।

जसे मिठ पाण्यात ।

असे आदी-अंती पाणी पाण्यात ।

अविनाश गुरु सत्य ।।१५।।


गुरु ज्ञानदृष्टीचे आगर ।

महासुखाचे माहेर ।

दाही दिशा भरले भरपूर ।

रेणू पाठी पोटी ।।१६।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।

चतुर्थ अध्याय गोड हा ।।१७।।


📖 अध्याय ५ वा

अमळ सद्गुरुचे ज्ञान ।

नाश नसे कदापि जाण ।

रेणू संपूर्ण आकाश धन ।

दाही दिशा गुरु एक ।।१।।


शब्द सद्गुरु पासून उमटता ।

शब्दरूपी देव दाता ।

शब्द संचारता अनेक देवता ।

अवघा शब्द ।।२।।


शब्द देहात येतो-जातो ।

एकवीस हजार सहाशे जप करितो ।

शब्द हृदयात नित्य नांदतो ।

अजप जप मंत्र चालतो ।।३।।


अजप हृदयी नांदता ।

ॐ हे शब्द काढता ।

सोहम आंत ओढता ।

अजपमूळ दोहींचे ।।४।।


शब्द ओंकार ।

चार अवस्था, वाचा चार ।

शब्द मुळ मायेचे माहेर ।

शब्द घर संताचे ।।५।।


पंचतत्त्व, गुण तीन भरला शब्द ।

विराट हिरण्य शब्द नाद ।

चित्त अंतर्यामी शब्द ।

प्रणवरूप ।।६।।


सप्तद्वीप, नवखंडात एक शब्द ।

शब्दाची शक्ती माया अगाध ।

दृष्टा सच्चिदानंद कंद ।

निर्गुण पुरुष ।।७।।


तोच सद्पद प्रकाश ।

चित्तपद त्यांचा अंश ।

पुरुष-प्रकृती आनंद घोस ।

आनंद एक मी ।।८।।


झीण आवाज अजपा पासून ।

अजपरूपी स्वरूप निर्गुण ।

अहं ब्रह्मासी शब्द त्यापासून ।

शब्द प्रणवरूप ।।९।।


शब्द खुंटला, वाणी बंद ।

अजप शब्द झीण नाद ।

निशब्द गुरुचा बोध ।

एकपणा आले ।।१०।।


आसन महाशून्यावरती ।

दाही दिशा सद्गुरु ज्योती ।

रेणू कोंदाटला नभ आकृती ।

पार नाही गुरुचा ।।११।।


गुरु सुख नित्य प्रकाश विभू ।

नामरूप आधार गुरु प्रभू ।

मन-बुद्धी वेगळा स्वयंभू ।

गुरु दाता अविनाश ।।१२।।


गुरुने आपणा सारिखे केले ।

मी-तू पणा द्वैत अज्ञान गेले ।

मूळच्या ठायी बसविले ।

स्वयंम स्वरूप देखता ।।१३।।


मोत्याचा चूर फेकिला अंबरी ।

विजा चमकती रेणू परी ।

मावळली रात्र अज्ञान अंधारी ।

माझा मी अमर ।।१४।।


आकाशातील आत्मा बाप पवित्र ।

तुझा छंद लागला मनी दिनरात्र ।

तू माझ्यात, मी तुझ्यात प्रार्थना मंत्र ।

महाआनंद सुख ।।१५।।


या वेगळे ज्ञान सांगती पाखंड ।

मूर्तीपूजा देवतांचे बंड ।

कल्पनेची पूजा शून्य मतकांड ।

तीर्थी पाणी पाषाण ।।१६।।


पंथ, मत, पुराणिक वादी ।

यांच्या लागू नका सत्य नादी ।

लोटतील अंधकुपात मधी ।

पागल मुळचे आंधळे ।।१७।।


माझा सद्गुरु बागवान ।

मी द्राक्षवेल, तुम्ही फांद्या सज्जन ।

सद्गुरुचा प्रेमरस जीवन ।

तुम्हा पोहोचवितो ।।१८।।


तुम्ही द्राक्ष घड द्या चांगले ।

जे जे सद्गुरुच्या राज्यात आले ।

जन्म-मरण दुःख मिटले ।

प्रकाश बापाचा ।।१९।।


जो वेल वाळून जाई तत्क्षणी ।

त्यासी बागवान टाकील काढुनी ।

जन्म-मरण त्यासी भोगी योनी ।

अंधारतला आत्मा हा ।।२०।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।

पंचम अध्याय गोड हा ।।२१।।


📖 अध्याय ६ वा

तुम्ही मानव अवघे देवांचे लेकरे ।

देव सद्गुरु दाता खरे ।

तुम्ही देवाद्वारी फसाल हो ।

अंधारातील आत्मे निवारा करा ।।१।।


पुराणिक लाटणे काढा ।

मग तुम्ही दसऱ्याचे कुसळ ओढा ।

पापाविषयी ठराल हो ।

काळे तोंड होईल देवद्वारी ।।२।।


आपल्या डोळ्यांतील पश्चात्ताप रोकडा ।

ध्यान करा पवित्र बापाचे ।।३।।


आकाशातील प्रभू एक असता ।

प्रत्यक्ष प्रमाण व्यर्थ का भासता ।

चंद्रावरून भरती येत असता ।

अनुभव प्रत्यक्ष ।।४।।


तिन्ही काल, सहा ऋतू ।

अनेक लक्षणे लागती वस्तू ।

सूत्र खेळविणार सद्गुरु समर्थ ।

नकळे अंत बापाचा ।।५।।


आकाशातील बापा पवित्र थोर ।

शुद्ध चैतन्य अमर ।

देवाच्या राज्यात रहावे अमर ।

थोर समर्थ सद्गुरु आपला ।।६।।


दिवस-रात्र वेळा पाच ।

प्रार्थना, समाधी करा साच ।

जितकी श्रद्धा, प्रेमरस ।

देव माझा, मी देवाचा ।।७।।


तीनशे साठ हाडांचा पिंजरा ।

तेतीस पाठीच्या मण्यांचा उबारा ।

त्यात कुंडलिनीचा ओविला दोरा ।

थोरला मेंदू ब्रह्मांडात ।।८।।


ज्ञानविचार मोठ्या मेंदूत ।

धाकटा मेंदू हालचाल करी देहात ।

त्यासी मन काय जग म्हणत ।

त्याचे शेपूट कुंडलिनी शक्ती ।।९।।


ज्ञानवाहक, स्पर्शवाहक ।

कुंडलिनी मेंदूला कळवी ठीक ।

इडा, पिंगळा, सुषुम्ना तिन्हीचा निरोप एक ।

सुषुम्ना चाले ।।१०।।


ऐकणे, पाहणे, स्वाद घेणे ।

मेंदूत निर्गुण छापणे ।

आकाशाहून मोठा, रेणूपेक्षा लहान परमपुरुष ।।११।।


त्याचा प्रतिबिंब हृदयात ।

अजपातून जपांत माळ चालत ।

ॐ सोहम चैतन्य ज्योत ।

चालतो मंत्र ।।१२।।


तिहींला साक्षी असता भ्रमात पडला ।

प्रारब्ध पाठी लागले, वासनारूप गढला ।

नाना संकटांत सापडला ।

बाप विसरता ।।१३।।


या करिता अवघे जन बापाकडे चला ।

तुमच्या बापाचा शोध करा चांगला ।

पवित्र आत्मा दयाळू भला ।

प्रभू दयाकरी ।।१४।।


मागील जन्मा मुक्त तुम्ही व्हा ।

पारखी पारख होऊनी रहा ।

प्रभू स्वर्गी देईल विसावा ।

शंका नाही ।।१५।।


नित्य प्रेम सद्गुरु ठेवा ।

आकाशात सद्गुरु नीलवर्ण पहा ।

मेघश्याम अमर आत्म्याचे गुण गा ।

आंत-बाहेर प्रभु एक ।।१६।।


पवित्र रूप डोळ्यापुढे खेळत ।

आंत-बाहेर एकच दिसत ।

कोटी सूर्याचा प्रकाश न माये गगनात ।

शुद्ध रूप सद्गुरुचे ।।१७।।


अंतकाळी देहातून तारा निघेल ।

आकाशातील बाप मिळेल ।

जन्म-मरणाचे भान मिटेल ।

झीण आवाज स्वरूपी ।।१८।।


जसे आकाश दिसे पाण्यात ।

त्याचे दर्शन घ्यावे अंतर्मनात ।

चारींचा एक मंथून अर्क ।

सद्गुरुदातासी पाहा ।।१९।।


एकच भरला, रिक्त ठाव नाही ।

डोळे उघडिता दिसे पाही ।

डोळे मिटता नांदे हृदयात ।

प्रत्यक्ष पहा ।।२०।।


स्वयंम स्वरूप आणि अरूप ।

असे सद्गुरुचे दोन्ही रूप ।

जीवासी भासला संकल्प ।

जीवाला अंधार दिसे ।।२१।।


तोच जीव देव राज्यात मारी झेप ।

झाला प्रकाशरूप, पदरी पडले माप ।

अव्यक्त सद्गुरुचे ज्ञान आहे सोपे ।

एकचित्त करून पहा ।।२२।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।

सहावा अध्याय गोड हा ।।२३।।

(समाप्त)


📖 अध्याय ७ वा

जय जय सद्गुरु दातारा ।।

अनंत भुवनी तुझा आसरा ।।

तूं अवघ्याचा खेळविसी दोरा ।।

तू सूत्र हालविसी ।।१।।


तू बाप पवित्र आत्मा ।।

तूच तत्वता असिपद रामा ।।

तू अल्ला, खुदा, निजधामा ।।

परी तू एक अरूप ।।२।।


तुजकडे एकचित्त लाविता ।।

तुझा प्रकाश भरला अनंता ।।

तू आंत-बाहेर सद्गुरुदाता ।।

पार नाही स्वरूपासी ।।३।।


देवाघरी जात-पात नाही ।।

सद्गुरु अवघ्याचा कर्ता पाही ।।

अविनाश गुरु व्यापिला सर्वां ठायी ।।

पवित्र आत्मा गुरु ।।४।।


अखंड करावे देवाचे ध्यान ।।

प्रेमभाव विश्वास धरून ।।

मेघश्याम नीलवर्ण ।।

कोटी सूर्याचा प्रकाश गहन ।।५।।


भिमराव सद्गुरुचे घेऊनी वचन ।।

मज केले निरूपण ।।

सत्स्वरूप अमर झीण ।।

पवित्र बाप दयाळू ।।६।।


दहा अवतार वहीवाट सरले ।।

अकरावा सत्ययुग लागले ।।

अकरावी आज्ञा द्वैत गेले ।।

प्रत्येकाला ध्यान बापाचे ।।७।।


महंमद पैगंबर, प्रभु येशूचे वचन ।।

व्यास, कृष्ण बोलले प्रमाण ।।

तोच अनुभव आला घडवून ।।

विसावे सनात छंद प्रभुचा ।।८।।


येथून पुढे तेरा महिन्याचे एक वर्ष होईल ।।

अठ्ठावीस दिवसाचा एक महिना ठरेल ।।

एक दिवस सुटीचा सर्व मानतील ।।

तीनशे पासष्ट दिवसांचे वर्ष ।।९।।


सहा दिवसांत सृष्टीपट रचला शब्दापासून ।।

देवाचा प्रतिबिंब पुरुष निर्माण ।।

पुरुषाची छाया शक्ती होऊन ।।

मातीचे पुतळे केले ।।१०।।


त्या दोघांपासून जन झाले निर्माण ।।

बेचाळीस पिढ्यांपर्यंत वाढवून ।।

आकाशवाणी केली देव रायाने ।।

नव्या मनूप्रती ।।११।।


ब्रह्मा, विष्णू, महेश तीन ।।

तिघांच्या स्त्रिया, आई-बाप दोन ।।

प्रत्येक वस्तूचा जोडा तारवेत होऊन ।।

बेचाळीस दिवस जलधारा ।।१२।।


तारू सांभाळिले देवाने ।।

बेचाळीस पिढ्या पाण्यात बुडवून ।।

नूहासी वचन दिले देवान ।।

वचन माझे सांभाळी ।।१३।।


हाम, साम, याफेथ पुत्र तीन ।।

तिघांपासून झाले जन ।।

त्यांसी ब्रह्म, विष्णू, महेश म्हणती पुराण ।।

मनू तोच नूहा ।।१४।।


देवाचे वचन भक्ताने सांभाळले ।।

एक पवित्र आत्मस्वरूप जाणले ।।

देवाच्या राज्यात सुख झाले ।।

प्रकाशातल्या आत्म्यांसी ।।१५।।


पवित्र आत्मा घटोघटी पहावा ।।

पिंडी-ब्रह्मांडी नवखंडी ओळखावा ।।

आकाशातील पवित्र बाप नित्य नवा ।।

सत्यप्रेम सद्गुरुचे ।।१६।।


अनंत उपकारी प्रभुदाता ।।

सद्गुरुची अवघ्यावर सत्ता ।।

अव्यक्त सद्गुरु तत्वता ।।

ध्यानी मनी सद्गुरु ।।१७।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।।

सप्तम अध्याय गोड हा ।।१८।।


📖 अध्याय ८ वा

तारणहार अविनाश सद्गुरुराव ।।

गुरुने आपल्या राज्यांत दिला पवित्र ठाव ।।

महासुख बापाचे भाव ।।

अंतरी अनुभवावा ।।१।।


निदान तरी पाच वेळा ।।

पवित्र आत्म्यावाचून दिन-रात्र चैन न पडे ।।

ध्यान परम ठाव ।।२।।


देवा आधी सद्गुरु अमर देव ।।

हृदयी प्रकाश सद्गुरु ।।

प्रार्थना करा अवकाश-व्रत ।।

पवित्र आत्म्याचा सोहळा ।।३।।


अनंत जन्मीच्या दोषांच्या ज्वाळा ।।

भस्म होतील प्रभू ध्यानी ।।

जन्म-मरणा वेगळा प्रभू करील ।।

आपल्या राज्यांत बसवील ।।४।।


गुरु तारता गर्भात, अंतकाळी ।।

परोपकारी अवघ्यासी सांभाळी ।।

सैतानाची होळी ।।

सद्गुरु करील ।।५।।


चौदा चक्रे, मात्रा बावन ।।

चार देह शब्दांपासून उत्पन्न ।।

शब्दामाजी प्रभुचे जीवन ।।

परम पवित्र आत्मा ।।६।।


परोक्षशास्त्री, ढोंगी, पाखंडी ।।

यांच्या लागू नका तोंडी ।।

त्यांची देवद्वारी काळी मूंडी ।।

दुःख भोगतील सत्य ।।७।।


एकाने देवाचा प्रेम द्यावा दुसऱ्यांसी ।।

नीचांचे उंच करावे मनुष्यासी ।।

अज्ञानी लावावे देवमार्गासी ।।

सत्य वचन पाळावे ।।८।।


आपल्या कुटुंबावर सत्य भाव ।।

त्यापेक्षा जास्त शेजाऱ्यावर प्रेम ठेवावे ।।

शांत व परोपकारी राहावे ।।

वचन पाळा प्रभूचे ।।९।।


नेत्र झांकून एकांती ।।

आकाशातील बापाचे ध्यान आदि-अंती ।।

आंत-बाहेर पवित्र आत्मा चित्ती ।।

एकरस प्रकाश गुरुचा ।।१०।।


आधी अज्ञान अस्पृश्यता दूर करा ।।

शुद्ध आरोग्य आचरण धरा ।।

दीन-दुबळ्यांसी द्या थारा ।।

मार्गी लावा अज्ञानी ।।११।।


असा नेम सत्पुरुषाचा ।।

नित्य प्रेम ध्यास सद्गुरुचा ।।

त्यांच्यावर प्रेम प्रभूचा ।।

अखंडित असे ।।१२।।


एक नीती, एक ईश्वर ।।

एक भाव, एक आचार ।।

एक प्रेम, एक विचार ।।

सर्वांचे एक मत असावे ।।१३।।


अकरावी आज्ञा, अकरावा अवतार ।।

सत्ययुग नवा मनू थोर ।।

प्रत्येकाचा गुडघा टेकतो भूमीवर ।।

पवित्र आत्म्यास भजतील ।।१४।।


चैतन्य आत्मा प्रेमस्वरूप सद्गुरु ।।

अव्यक्त अविनाश, न लागे पारु ।।

अढळ, अमळ, अमूप परात्परु ।।

क्षर-अक्षर त्यासी नाही ।।१५।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।।

गुरु सांगे शिष्यासी सुविचार ।।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थीतो वारंवार ।।

अष्टम अध्याय गोड हा ।।१६।।


📖 अध्याय ९ वा

अव्यक्त सद्गुरु दातारा ।।

परमात्मा रामा तुज म्हणती दातारा ।।

आकाशातील बापा पवित्र आत्मा हरिहरा ।।

अनंत नाम तुझे ठेविले आम्ही ।।१।।


अल्ला, नबी, खुदा नूर भरला सारा ।।

तुम्हांसी मूळ न ये अवधारा ।।

तुजविण थोर निर्धारा ।।

कोणी नसे ।।२।।


आकाशवत दृष्टी करून ।।

चित्त लावावे देव चरणी ।।

जो अंधार तो प्रकाश होऊन ।।

आंत-बाहेर प्रभू एक ।।३।।


जितका नेम ठेवाल देवावरी ।।

जो विसरत नाही देवास दिन-रात्री ।।

तयाच्या हृदयात अंतरी ।।

प्रकाश सदोदित ।।४।।


शुद्ध अंतःकरण अद्वैत ठेवावे ।।

आपल्या मुलांपेक्षा शेजाऱ्यांवर प्रेम ठेवावे ।।

नीचांना ज्ञान देऊन उंच करावे ।।

लावावे प्रभु ध्यानी ।।५।।


एक पवित्र सद्गुरुचे रूप ।।

चोवीस तास प्रेम करावे खूप ।।

अज्ञान अंधार उडेल झोप ।।

मळ काढा अज्ञानाचा ।।६।।


सर्पासारखे सावध रहावे ।।

कबुतरासारखे साळसूध व्हावे ।।

नित्य आकाशातील राज्यांत जावे ।।

पाखंड मत टाकून ।।७।।


याची साक्ष दिली संतांनी ।।

अनेक पैगंबर, मुनी, ज्ञानी ।।

व्यास, वाल्मीक अपार यांनी ।।

सत्य सांगितले ।।८।।


देवाच्या राज्यात भेदभाव नाही ।।

या राज्यात निर्भय होई ।।

पवित्र बाप सर्वांचा पाही ।।

निरोप एक ।।९।।


पवित्र आत्मा चारी रंग फुलला ।।

अणु-रेणू प्रमाणही न दिसे ज्याला ।।

राईच्या हजाराव्या भागात भरला ।।

रीत ठाव नाही ।।१०।।


तुम्ही माझे शिष्य आणि इतर जन ।।

या ग्रंथाचा अभ्यास करा रात्रंदिन ।।

तुटेल भवबंधन ।।

विश्वास ठेवा ।।११।।


या परता उपदेश उरला नाही ।।

शरीराचा डोळा दिव्याने आकाश पाहे ।।

नीलवर्ण मेघश्याम दिसे ।।

पवित्र आत्मा अवघा ।।१२।।


माझा नमस्कार तुम्हा सर्वांना ।।

एक पवित्र रूप सोडू नका ।।

पवित्र आत्माराम जोड सखा ।।

इतर सर्व क्षुद्र ।।१३।।


अहमदनगरापासून एक योजन दूरी ।।

पश्चिम भागी अवधारी ।।

वडगाव आमली, सीना तीरी ।।

पुण्यभूमी ती ।।१४।।


येथे पुरुष महामुनी ।।

दास गणपत आत्मज्ञानी ।।

सद्गुरु प्रसादे करुनी ।।

ग्रंथ रचिला ।।१५।।


शके अठराशे छप्पन्न साली ।।

चैत्र मास प्रतिपदेस ध्वजा उभारली ।।

ग्रंथरचना पूर्ण झाली ।।

सद्गुरु कृपेने ।।१६।।


अनुभव सिद्धांत ग्रंथ थोर ।।

गुरु सांगे शिष्यासी विचार ।।

गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ।।

नवम अध्याय गोड हा ।।१७।।

अनुभव सिद्धांत समाप्त !

Post a Comment

0 Comments