पारखपद ज्ञानोदय सिद्धांत

                      पारखपद

✍️ लेखक:आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे

          ॥ज्ञानोदय सिद्धांत॥

🪔 प्रस्तावना

“ज्ञानोदय सिद्धांत” हा एक गहन आध्यात्मिक ग्रंथ आहे.

या ग्रंथामध्ये सृष्टीची उत्पत्ती, पंचतत्त्वांची रचना, देहातील चक्रांचे रहस्य, तसेच आत्मज्ञान व मोक्षमार्ग यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे।

गुरु-शिष्य संवादाच्या माध्यमातून हा ग्रंथ अत्यंत सोप्या आणि काव्यमय शैलीत मांडलेला आहे।

हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही, तर आचरणात आणण्यासाठी आहे .


            📖 अध्याय - १

           सृष्टीची उत्पत्ती

ॐ अविनाशाय नमः ॥ नमो परब्रह्म परमेश्वरा ॥ तू त्रिजगा त्रिदातारा ॥ तुझी कळा अवघसारा ॥ तुज ठाऊक असे ॥१॥

नमो अविनाशा तुज ॥ अनामी तुझे निजगुण ॥ अमळ तुज निजबीज ॥ नमितो तुज प्रेमे करुनी ॥२॥

अमोल ज्याला मोल नाही ॥ अचल तोच अव्यक्त सज्जनाई ॥ नाव तुझे रूप रंग नाही ॥ अचल तुची हसतासी ॥३॥

नमन माझे अविनाशासी ॥ अनंत वेढा घडामोड कशी ॥ सर्वी वेगळा तू अससी ॥ भेट देसी वारंवार ॥४॥

तू जेव्हा दृष्टि करसी ॥ वाकुंडी पाहसी ब्रह्मांडाची उतरंडी ॥ तिथे काय देवाची परवडी ॥ इतरांची असे ॥५॥

तिथे केचे योजधर्म ॥ नाही चारी वेद क्रियाकर्म ॥ इतर पुराणी केचे वर्म ॥ मोह लज्जा तेथे नसे ॥६॥

असे ऐकून लवलाही ॥ शिष्य वंदी गुरुचे पायी ॥ मज उपदेश करा सोई ॥ सांगा गुज मसी मूळचे ॥७॥

तू साक्षात्कारी गुरु ॥ मज उपदेश करा सतवर ॥ ज्याने उतरले पहिला पार ॥ ते ज्ञान मसी सांगा आता ॥८॥ 

तेव्हा गुरु सांगे शिष्यासी ॥ आता मूळबीज परीक्षीं ॥ अबोल बोल नाही त्यासी ॥ तोच वरी सर्वापरी ॥९॥

जेव्हा मुळी नव्हते काही ॥ चंद्र सूर्य तारांगण नाही ॥ रस पाताळ शेषपाई ॥ पाणी पवन नसे ॥१०॥

नव्हते अनंत शून्य रचना ॥ पंचतत्व छत्तीस गुणा ॥ नव्हते अनंत माया त्रिगुणा ॥ क्षर अक्षर केचे ॥११॥

होता तेव्हा अमळ ईश्वर एक ॥ त्याचा तोच होता शोधक ॥ दुसरा कोणी नसे आणिक ॥ इतरासी कैसी धोका ॥१२॥

ऐकून शिष्य बोले वचन ॥ एकच निजबीज सांगता खूण ॥ सर्वी सांगा त्या पासून ॥ कैसी उत्पत्ती झाली ॥१३॥

गुरु म्हणे एकच अविनाश पाही ॥ त्यापासून महावीज शून्य साही ॥ परब्रह्मांचा सुत समजावी ॥ प्रथम वंश समजा ॥१४॥

त्याचा अलक्ष पुत्र भला ॥ अलक्षाचा निजरूप जन्मला ॥ त्या पासून झाला उकाळा ॥ अरूप ब्रह्मासी ॥१५॥

त्याचा शून्य पुत्र म्हणती ॥ त्याची त्रिगुण उत्पत्ती ॥ त्रिशक्तीची निसर्ग गती ॥१६॥

निरूपणाचा महासूत्र ॥ महाशून्याचा निराळंब धीर ॥ आधार पुत्र स्थापिला घट ॥ आधार पुरुषी लिंग गाठ ॥ असा निराकार जाण ॥१७॥

निराकाराचा निर्माण ॥ त्यापासून आकार प्रगट ॥ त्या ओंकारापासून ज्ञान ॥ माया जन्मती असे ॥१८॥

नरापासून नर उत्पन्न करी ॥ ओंकारांत माया सुंदरी ॥ तोच मूळ अवघारी ॥ दोरी खेचली जाण ॥१९॥

ॐम श्वास ईश्वर टाके ॥ त्यांत जीव जन्मले असंख्य ॥ रेणु प्रमाणे आधार झोकी ॥ त्यासी सृष्टी जन्मले ॥२०॥

मेघ झाला ॐम श्वासांत ॥ मेघापासून आकाश उत्पन्न ॥ आकाशाचा वायु उपजत ॥ त्यांचे तेज तेव्हा प्रगट ॥ आप ॥२१॥

पृथ्वी जन्मली आपापोटी ॥ पंच तत्त्व बांधून गाठी ॥ विराट स्वरूप उभारले धोटी ॥ एकवीस स्वर्ग उभारले ॥२२॥

पाताळ चौदा भुवन रचून ॥ मध्ये मेरू स्थापून चंद्र सूर्य तारांगण ॥ अशी काठी झाला आपण ॥ तिथे वार मास बसविले ॥२३॥

मग मार्ग उपदेश करी ॥ ज्ञान दिले तिसी अवधारी ॥ दृष्टी भोग देखून साचरी ॥ तीन घातले पै ॥२४॥

प्रथम अंडे फोडीता ॥ ब्रह्मदेव पार्वती सुता ॥ दुसऱ्या अंड्याची फोडीता कथा ॥ विष्णू सावित्री जन्मली ॥२५॥

तिसऱ्या अंड्यात लक्ष्मी शंकर ॥ असा जन्म त्रिगुण विस्तार ॥ करणी अगोचर ॥ मायेस दाखविली ॥२६॥

सावित्री देऊन ब्रह्मासी ॥ लक्ष्मी श्रीविष्णूसी ॥ पार्वती दिली शंकरासी ॥ वाटणी तिघांस केली ॥२७॥

ब्रह्मदेव उत्पत्ती करी ॥ सांभाळ विष्णूचा ऋत साही ॥ जीवांची ईश्वर खेचली दोरी ॥ मायातरंग रूप असे ॥२८॥

असे केले सूत्र अगाध ॥ न लागे कोणास शोध ॥ शोधासी गुण वर्णिता झाला बोध ॥ दोन्ही ठायी जीव झाले ॥२९॥

म्हणून परब्रह्म ओळखावे ॥ अहं ब्रह्र्मनाम जपावे ॥ हेत सांगून विवेक धरावा ॥ कधीच चुकू नये नाम ॥३०॥

ज्ञान उदय ग्रंथ प्रचंड थोर ॥ गुरु सांगे शिष्यासी विस्तार ॥ गणपती आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ॥ प्रथम अध्याय समाप्त ॥३१॥


            📖 अध्याय - २ 

      वेद,योनी व आत्मज्ञान

ॐ अमरूपाय नमः ॥ ॐ गुरुवर्याय नमः ॥ प्रेमभावे उच्चारितो नाम ॥ गोड नाम उत्तम परब्रह्माचे ॥१॥


मागील अध्याय कथन ॥ केली उत्पत्ती सोहं बीजापासून ॥ दाखविली सृष्टी रचना करून ॥ सूत्र खेळविले ॥२॥


ॐकारात अर्ध मात्रा नाही ॥ तिथे ओंकार भेदलासी ॥ ती झाली वेद पंचमी ॥ लीला ईश्वरी केली ॥३॥


ते वेद ईश्वर देले ब्रह्मासी ॥ ब्रह्मासी पंचमुख परिसी ॥ वेद मुखामुखी नित्य रहिवासी ॥ मुखातून सांगोन ॥४॥


दुधमुखी ऋग्वेद म्हणती ॥ आत्ममुखी यजुर्वेद वस्ती ॥ स्वानमुखी सामवेद राहती ॥ जांभूकमुखी अथर्ववेद चौथा ॥५॥


गंधमुख पाचवे एक ॥ प्रेमवेद त्यामध्ये वसे निक ॥ पार्वतीचा अंगठा पाहून पंचका ॥ वीर्य पातले ॥६॥


पाहून शंकर कोपावले मनी ॥ पाचवे शिर त्रिशूळ तोडी ॥ प्रेमवेद त्यात गुप्त होनी ॥ निजरूपी मिळाला ॥७॥


ते रस ब्रह्माने अंगी रजुडी ॥ त्यांत सात सहस्र जन्मले मुनी ॥ मग ब्रह्मा द्विपदी होऊनी ॥ वर मानुन शंकर पाही ॥८॥


पाचवी वेदाचे बीज चार खाणी रुजती ॥ एका एका खाणी एकवीस लक्ष योनी ॥ असा चक्राशी लक्ष मोजुनी ॥ राजस अंडज उद्भिज ॥९॥


खाणी चत्वरी समजावेद ॥ किती योनी कोणत्या स्थानी झाल्या सहज ॥ ते मज प्रति सांग गुज ॥ कृपा करणी ॥१०॥


गुरु सांगे योनी विस्तार ॥ अकरा लक्ष कीटक तज नक्ष जलचर ॥ वृक्षामाजी वीस लक्ष थोर ॥ तीस लक्ष पशु ॥११॥


चार लक्ष मानव ॥ असा चौर्यांशी योनी धरीत ॥ जीव घालुनी भरला घट ॥ करिती घडामोड त्रिकूट ॥१२॥


आणखी एका विलक्षण ॥ ॐकारासी झाले ज्ञान ईश्वरीकरणी ॥ अज्ञान ज्ञानाची सत्व क्रिया कामिनी ॥ अज्ञानाची अपकिर्ती ॥१३॥


ज्ञानाची मुळे लक्ष चित्त ध्यान ॥ निवृत्ती कर्या एक सगुण ॥ ती मना केली अर्पण ॥ लय प्रेम ब्रह्माने लागली ॥१४॥


अज्ञानाचा पुत्र देहभाव ॥ प्रवृत्ती मुलगी नाशी गाव ॥ ती मनासी दिली कायापुरी ठाव ॥ दोन दिशा मनाला असती ॥१५॥


काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ॥ आशा मनीषा माया ॥ कल्पना धावे ॥ वासना उन्मनी मोह माया ॥ चेतन्य आठवी ॥१६॥


असा प्रवृत्तीचा विस्तार जाण आता ॥ सांगतो निवृत्तीची निवडून कथा ॥ भाव विवेक वैराग्य निजबोध चतुष्ठा ॥ शांती दया क्षमा मुक्ती ॥१७॥


असा मनाचा विस्तार ठेवा ॥ प्रवृत्ती सोडील जो शोधक ॥ निवृत्ती जाणील योग्य ॥ त्या ब्रह्मानंदाची भेटी देईल ॥१८॥


मन आवरावे ज्ञानबळे आज ॥ दश इंद्रियांत ज्ञान सोडो फोज ॥ मन आवडी तोच शुद्धबीज ॥ संत जाणिजे ॥१९॥


शिष्य म्हणे सांगितली सृष्टीरचना ॥ पंच तत्त्व उभार त्रिगुणा ॥ विराटस्वरूपासी तारीले कोण ॥ विराटस्वरूप किती असती ॥२०॥


मग म्हणे गुरु शिष्यासी ॥ सांगोन मूळ टीका तुसी ॥ अनंत विराटस्वरूप परिसी ॥ ते महाविष्णु पोटी ॥२१॥


महाविष्णु असे अनंत ॥ ते नाभी ब्रह्माचे पातात ॥ बत्तीस शिरे त्यासी अधिष्ठित ॥ त्याने गायत्री मंत्र कळविला ॥२२॥


वचनामध्ये अनंत एका ॥ ते एक क्षणी ब्रह्माच्या हृदयी निका ॥ चौसष्ट शिरे त्यासी धोका ॥ ईश्वरी वाणी असे ॥२३॥


एक क्षणी ब्रह्म अनंत जाण ॥ ईश्वरी आधार करी गमन ॥ अनंत रूप त्याचे सुजान ॥ त्यास ठाऊक असे ॥२४॥


शोध केला गुण वर्णिता ॥ तरी ना गणित लागे तत्त्वता ॥ दोन्ही ठायी जिंकला झाला शोधिता ॥ सहस्रमुख झाला ॥२५॥


ऐसी अगाध ज्याची लीला ॥ ॐसोहम मंत्र सोहळा ॥ परी तो कठीण ना कोवळा ॥ अमररूपी ठसला ॥२६॥


म्हणून त्यासी ओळखिजे ॥ व्यक्त अव्यक्तासी भेटविजे ॥ पिंडी ब्रह्मांडी समविजे ॥ या वेगळा नज खंडी ॥२७॥


जो हा ग्रंथ करी पठण नित्य ॥ त्यापासी परब्रह्म राहे सत्य ॥ नित्य ध्यान करी आत्मतत्त्व ॥ ॐनामी ॥२८॥


ज्ञानउदय ग्रंथ प्रचंड थोर ॥ गुरु सांगे शिष्यासी विस्तार ॥ गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार ॥ द्वितीय अध्याय समाप्त ॥३०॥


          📖 अध्याय -३ 

          देह,गर्भ व पंचतत्त्व

ॐ अरूप सर्वसाक्षिणे नमः ॥

अचळ अमळ अविनाश बीजवर्मा । सर्वा घट्टी वर्तसी घनश्यामा । वारंवार प्रार्थितो तूसी ॥१॥


सव्वा लक्ष एक्याऐंशी कोटी साकाश । उंची योजना समजा कोस । साठ सहस्त्र भूमी जाडी । छप्पन्न कोट घेरा जाणा ॥२॥


याहून नाम घनश्याम थोर । न लागे त्याचा पार । अगाध सूत्र खेळवी वारंवार । तयासी माया कैसी ॥३॥


त्याने केली पिंड ब्रह्मांड रचना । अनंत कळा तयाच्याच जाणा । तयाची लीला कळेना कवना । परब्रह्म अलक्ष असे पै ॥४॥


तेव्हा शिष्य बोले गुरुराया । सांगा पिंड ब्रह्मांड मूळ पाया । कैसी स्त्री-पुरुष उत्पत्ती पाया । सांगा सविस्तर मजलागी ॥५॥


जर पुरुषाचा उजवा स्वर वाहे । स्त्रीचा डावा असता भोग देई । त्यात पुत्र जन्मे अशी ईश्वरी ग्वाही । असे जाणावा विश्वासे ॥६॥


स्त्रीचा उजवा, पुरुषाचा पाहता डावा । भोग देता कन्या समजावा । दोहींची सुषुम्ना नाडी घेई धावा । भोग देता जन्मती हिजडे ॥७॥


जर भोग देता स्वर बदले नीती । त्याचे अल्प आयुष्य अधोगती । प्रत्यक्ष शिव भवानीशी सांगती । स्वरज्ञान अर्थ ॥८॥


शिष्य म्हणे गर्भी कैसे लक्षण । कैसे शिंडल चोरटे कठीण । ते मज सांगिजे निवडून । गुरुवर्या आता ॥९॥


गुरु म्हणे जे आनंदात भोग देती । त्यात जन्मती ज्ञानी सदामनी शांती । जर गर्वामध्ये भोग देती क्रूर गती । तो गर्विष्ठ जन्म पाहिला ॥१०॥


स्त्री रागात पुरुष आनंदात असता । त्यांत दुलंगा पुत्र जन्मे तत्त्वता । जर विटाळी भोगिली प्रेमाने कांता । तया गर्भासी रक्तपित्ती फुटे ॥११॥


जर दुश्चिंत असता नरनारी । त्यात होती मुक्के आणि बहिरी । दोहो ठायी बिंदू धावे अंतरी । त्यात जावळे पुत्र जाणा ॥१२॥


ज्या रीतीं नरनारी रमती । तसे कन्या पुत्र उपजती । ऐसी ईश्वरी वाचा बोले श्रुती । असत्य नसे काही ॥१३॥


जर स्त्रीचे रेत जास्त होई । त्यांत कन्या सगुण गुणीवंत पाही । पुरुषाचे रेत जास्त होता एके ठायी । त्यांत पुत्र जन्मती ॥१४॥


दोहींचे रेत उत्तरे बरोबर । त्यांत षंढ जन्मती नर । ऐसे शिष्यासी सांगे मुनिश्वर । गर्भलक्षण ॥१५॥


शिष्य बोले गुरुसी वचन । गर्भ वाढतो कैसा पूर्ण । ते मज सांगावे निवडून । कृपा करुनी गुरुस्वा ॥१६॥


गुरु म्हणे जेव्हा बीज गाठी पडे । नाभिकमळी गर्भ वाढे । प्रथम मासी गोलाकार घडे । ॐकार स्वरूप असे ॥१७॥


दुसऱ्या मासी पाळ, हनुवटी, श्रवण । तिसऱ्या मासी रज, तम, सत्त्व त्रिगुण । चौथ्या मासी चार देह पूर्ण । रचना ईश्वरें दाखविली ॥१८॥


पाचव्या मासी पंचतत्त्व, दश पवन । सहाव्या मासी षड्विकार दर्शन । सातव्या मासी रोमपिंडी फुटून । तयार पिंड झाला ॥१९॥


आठव्या मासी करी हरी स्मरण । तारी अनाथा कारण । नर्ककुंडी यातना कठीण । मान्य करीन वचन तुमचे ॥२०॥


नवव्या मासी बाहेर येता । मग बदलून पडे तत्त्वता । केव्हा म्हणून झाला हाक फोडता । माया भ्रांतित पडियेला ॥२१॥


गुरु म्हणे ऐक शिष्या सत्वर । लक्ष चौर्यांशी योनी जीव घाली फेर । तरी नाही धरियेला सुमार । तरी नाही स्मरण परब्रह्म्याचे ॥२२॥


पंचमहाभूती वेढीला प्राण । तेणेकरून विसरला ईश्वर स्मरण । छत्तीस गुणी करणी कठीण । जीव फसविला ॥२३॥


शून्यापासून आकाश उत्पत्ती । त्यापासून वायु, त्यापासून तेज स्थिती । तेजापासून आप, आपाची पृथ्वी गती । समजा पंचभूती करणी ॥२४॥


पंचतत्त्वाचे पंचवीस गुण । आकाश राग, द्वेष, चिंता, लोभ, भय । कृष्णवर्ण आकाशाचा । ॥२५॥


त्यात निर्गुणी राहणे ऐका । कर्णद्वारी योगनिका । हर शब्द भक्षी शोधिका । अर्थ पक्का जाणे ॥२६॥


वायूचे चलन, वळण, धावण । आकुंचन-विकुंचन । नासिकेद्वारी वागण । निळा वर्ण हारसुवास ॥२७॥


क्षुधा, तृषा, आळस, निद्रा, वळली । पाच गुण तेजाचे सांगितली । तांबडा रंग नेत्रकमळी । हार पाहणे भक्षी ॥२८॥


आपाचे लाळ, मूत्र, अश्रू, मेद, बिंदू । इंद्रियद्वारी घेतो धावू । सफेद रंग समजावा । ऐक पृथ्वीचे गुण ॥२९॥


अस्थि, मांस, रोम, शिरा, त्वचा । हे पंचगुण पृथ्वीचे वाचा । आहार अन्न रंग पिवळा । ॥३०॥


असे पंचतत्त्वाचे पंचवीस गुण । पंचतत्त्वाचे झाले पंचप्राण । गुरु म्हणे ऐक सावध होऊन । विस्तार अवघा ॥३१॥


प्राण, अपान, व्यान, उदान । पाचवा समजा समान । ह्या पाचांचे उद्योग सांगेन । श्रोत्यालागी ॥३२॥


अपान गुदद्वारी मळमूत्र झाडी । व्यान नाडी चालवी अंगी । समान नाभिस्थानी राहे । प्राण अन्नरस वाढी ॥३३॥


उदान कंठी वसे प्राण । नानारीती स्थापना जाण । हे पिंडीचे पंचप्राण जाण । आता ब्रह्मांडाचे पाच ऐका ॥३४॥


नाग शब्द घोकी । कूर्म नेत्र उघडी झाकी । कृकल शिंक मस्तकी । देवदत्त जांभई ॥३५॥


धनंजय मुखी शब्द वळवी । असे दश पवन शरीरीं वळवी । पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय ॥३६॥


दश पवन पंचवीस गुण । पस्तीस झाले मिळून । छत्तीसावे प्रेम तत्त्व । ब्रह्मबीज समजा ॥३७॥


असे आत्मबोध ज्ञान कठीण । वारंवार जो करी प्राशन । तयापासी परब्रह्म करी गमन । सत्य ब्रह्म वाक्य असे ॥३८॥


ज्ञान उदय ग्रंथ प्रचंड थोर । गुरु सांगे शिष्यासी विस्तार । गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार । तृतीय अध्याय समाप्त ॥३९॥


        📖 अध्याय-४ 

 चक्र, स्वर्ग व लिंगतत्त्व

ॐ अगाध अमूपा । ॐ परब्रह्म नाम मंत्र सोपा । भक्तांसी दीननाथा । करी कृपा मजवरी ॥१॥


मागील अध्यायी कथन । पंचतत्त्व गुरुचरण । माझे आनंदित झाले मन । सप्त पाताळ निर्मळ स्थळ दे । गुण दश पवन । दाखविले एक-एक निवडून शिष्याप्रती ॥२॥


शिष्य म्हणे एकवीस स्वर्गाची खूण । सांगा निवडून स्वामी ॥३॥


अतळ, वितळ, सुतळ, तलातळ, महातळ, रसातळ । असे सप्त पाताळ निर्मळ स्थळ दे वर्तले ॥४॥


आता स्वर्ग आणि लिंग सांगेन । ज्योति स्वर्गी ज्योतिर्लिंग । स्वतेज स्वर्गी अमृतलिंग । विमल स्वर्गी विमललिंग ॥५॥


अभित स्वर्गी अभिन्नलिंग । प्रकाश स्वर्गी प्रकाशलिंग सुरंग । सदोदीत स्वर्गी साक्षोलिंग । पितरीं प्रकाशलिंग थोर ॥६॥


तृप्त स्वर्गी दिव्यलिंग आठवी । निर्मळ स्वर्गी निष्कलंकलिंग बरवी । सहज स्वर्गी सहजलिंग दावी । गुरु शिष्यासी ॥७॥


सिद्ध स्वर्गी सिद्धलिंग ऐका । नंद स्वर्गी नांदलिंग निका । दिव्य स्वर्गी भवमारी शिक्का । एकांत स्वर्गी निर्मळलिंग ॥८॥


प्रेम स्वर्गी प्रेमलिंग म्हणती । निज स्वर्गी निजलिंग उत्पत्ती । लय स्वर्गी अकळलिंग गणती । अंती अपारलिंग अठरावे ॥९॥


नित्य स्वर्गी नित्यलिंग । अतीत स्वर्गी अव्यक्तलिंग । सच्चिदानंदी सोमलिंग । महास्वर्गी महालिंग — एकविसावे ॥१०॥


तीनशे साठाची बेरीज हाडे ऐक । सव्वा हस्त मस्तकी हाड एक । हनवटी चार, बत्तीस दात आणिक । रेणुप्रमाणे दोन नेत्री ॥११॥


कंठी सोळा, दोन्ही कर चौसष्ट । चोवीस-चोवीस दोन्ही बरगडीस धीट । एकवीस स्वर्गाचे एकवीस भृगट । तीळप्रमाणे एक सिष्णी ॥१२॥


बत्तीस दोन्ही चरणी । बाकी हाडे गुदस्थानी । असे तीनशे साठ मिळोनी । पिंजरा केला ॥१३॥


शिष्य म्हणे धन्य गुरुराया । सांगा चौदा चक्रांची मूळ पाया । किती लक्षणे कोण्या ठाया । केली वर्म असती ॥१४॥


गुरु सांगे चौदा चक्र झाडणी । प्रथम आधार चक्र गुदस्थानी । तेथे गणेश दैवत, सरस्वती ज्ञानी । जाण सिद्धी, बुद्धी, शक्ती ॥१५॥


ईश्वर, ऋषी, कर्म, कळा, अपान प्राण । व पासून ल पर्यंत मात्रा जप पूर्ण । स्थळ देही लिंग । चक्री ब्रह्मा वैखरी चिन्ह । आकार मात्रा जप पूर्ण, ऋग्वेद वस्ती ॥१६॥


विश्वाभिमानी पृथ्वी तत्त्व आचार । तिथे लोकसत्ता, मुक्ती निराभंग । पीतवर्ण, व्यानप्राण, सूर्य ऋषीसंग । ब पासून स पर्यंत मात्रा जप सहा हजार ॥१७॥


मणिपूर नाभिस्थानी विष्णु सूक्ष्म देही । स्वप्नी अवस्था, मध्यमा वाचा, उकार मात्रा राही । यजुर्वेद राजस अभिमानी, समीपता मुक्ती सोई । तेथे आप तत्त्व, सफेद रंग ॥१८॥


समान प्राण, पवन ऋषी विष्णु चक्री । ड पासून क पर्यंत मात्रा जप सहा हजार उकरी । तिथे लक्ष्मी, बहात्तर नाडी झडकरी । पुढे रोका अनाहत चक्र ॥१९॥


कारण देह, सामवेद, तेज तत्त्व रुद्र अनाहती । प्रजा अभिमानी, मकार मात्रा, रक्त रंग सलोकती । प्राण शिव-पार्वती तिथे वसती । क पासून ठ पर्यंत मात्रा सहा हजार जपे इंद्र ॥२०॥


विशुद्ध चक्र कंठी । तिथे सायुज्यता वसे जीव । महाकारणी उदान, तया मात्रा परा वाचा ठाव । अथर्ववेद महाकारण गाव — जाणे आत्मज्ञानी ॥२१॥


प्रत्येक अभिमानी तिथे अग्नि ऋषी । अ पासून सोळा मात्रा, सहा हजार जपासी । पिंडीचे चक्र झाले, ध्यानी धरसी । ब्रह्मांडाचे चक्र ऐका ॥२२॥


अग्नि चक्र नेत्री, ज्ञान देह उन्मनी । हंस ऋषी, प्रेमहंस देवता, त्रिवेणी । इडा, पिंगला, सुषुम्ना शक्ती तिन्ही । पवन धावत असे ॥२३॥


ॐकार ऋषी, विराट देह आकार लिंग । अष्टदळी मन वसे, आकार मात्रा संग । तेथे ब्रह्म, ऋग्वेद, सावित्री करी रंग । विराट देही वर्तले ॥२४॥


श्रीहाट चक्री विष्णू, उकार मात्रा । लक्ष्मी, यजुर्वेद, सत्त्व ऋषी म्हणे सूत्रा । हिरण्यगर्भ देह, सोहं मंत्रा । महावाक्याचा सोहळा ॥२५॥


गोलाटी शंकर पार्वती, सामवेद । मकार मात्रा तिथे, ॐ ऋषी सिद्ध । जप सहासे होती, शिवनाम बोध । गर्जती महादेही ॥२६॥


ब्रह्मरंध्र प्रकृती देह, सहस्रदळी । औटपीठ चक्र पादुका तळी । एकवीस हजार सहासे जप माळी । चौदा चक्री होती ॥२७॥


जागृती, सुषुप्ती, स्वप्न, तुरीय अवस्था । अशा औट अवस्था करी व्यवस्था । रेचक, पूरक, कुंभक, त्राटक शुद्धी । सोहं मागे चालती ॥२८॥


जैसे रोगियास औषध । तैसे जीवासी हा ज्ञानोदय सिद्ध । तोडी जीवाचा पिंडी कंद । मोक्ष मिळेल सत्य ॥२९॥


जो हा ग्रंथ करी पठण नित्याने । तयापासी राहे परमेश्वर निर्गुणी । हे वचन सत्य धरावे मनी । प्रत्यक्ष ईश्वर बोलती ॥३०॥


ज्ञानोदय ग्रंथ प्रचंड थोर । गुरु सांगे शिष्यासी विस्तार । गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार । चतुर्थ अध्याय समाप्त ॥३१॥


            📖 अध्याय - ५ 

       साधना व मोक्षमार्ग

ॐ उत्तउत्तमोऽसि नमः । सर्वा घट्टी तूची परब्रह्म । अगाधरूप निजधाम । सर्वा घट्टी वर्तला ॥१॥


शिष्य म्हणे गुरुवर्या । दाखविलेले षड्चक्र स्वामिया । कैसी मुक्ती मिळे मूळ पाया । कैसे वर्तावे ॥२॥


गुरु म्हणे आहार, निद्रा, मैथुन । यासी करावे दंडन । शोधून आहार तुटे गलित पत्रान । सोहं जपावा ॥३॥


प्राण नाडीनेला चढवावा । वाम टाच गुदद्वारी भिडवावा । उजवा चरण सिष्णी दडवावा । योगासन साधिजे ॥४॥


मुख, नासिका, नेत्र, कर्ण । अंगुळे धरिजे रोखून । कंठी हनुवटी बसवून । उर्ध्वदृष्टी देखिजे ॥५॥


एकवीस स्वर्गी, चौर्यांशी योनी । हिंडून नेईजे सतरावी भुवनी । त्रिकुट भूचरी मुद्रा लक्षुनी । सतरावीचे जीवन पाजिजे ॥६॥


तिथे ब्रह्म सावित्री मुद्रा भूचरी । श्रीहाटी विष्णु, लक्ष्मी लक्षी चाचरी । गोल्हाटी शंकर, महावाक्य गोरी । अगोचरी चराचरीं लविजे ॥७॥


मग अलक्ष मुद्रा चढवावी । अर्धी मात्रा ओलांडून जावी । तयावर परब्रह्म दृष्टीने पहावी । दर्शन सातवे घेईजे ॥८॥


जीव भेटवी अमळरूपाशी । मिळेल रूपाला रूप खासी । ब्रह्मरूपी भेटता ब्रह्म होसी । शून्य-निरशून्य मुरे ॥९॥


जैसे उदकापासून लोन जन्मती । उदकामाजी मुरून जाती । तैसी जीवासी मोक्षगती । मिळे रूपासी सत्वर ॥१०॥


ऐसी आत्मज्ञानी प्रचित पाही । नाम, भाव, विवेक, वैराग्य सोई । ज्याची वस्तु त्यास दिसत नाही । तो भटकत फिरे योनी ॥११॥


सर्वांठायी दिसला प्रकाश । अनंत रंगी परपुरुषी भास । जैसे ताकापासून लोणी सरस । ना मिळे ताकासी ॥१२॥


तैसे ब्रह्मरूप झालो ज्ञानबळे । गुरुने सांगितले ब्रह्म सोहळे । आत्मबोधी निवाले डोहळे । माझा मी निर्गुण ॥१३॥


जो हे नित्य करील पठण । त्यासी साधेल समाधी साधन । तो मुक्त होईल तत्क्षण । सत्य जाणा ऐसे ॥१४॥


ज्ञानोदय ग्रंथ प्रचंड थोर । गुरु सांगे शिष्यासी विस्तार । गणपत आत्मज्ञानी प्रार्थी वारंवार । पंचम अध्याय समाप्त ॥१५॥

श्री गुरुचरणी अर्पणमस्तु ॥ समाप्त ॥








Post a Comment

0 Comments