महाशिवरात्री निमित्त जखणगाव येथे मोफत व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन !
प्रतिनिधी : श्रीकांत चौरे पारनेर
जखणगाव, ता. जि. अहिल्यानगर येथे महाशिवरात्री निमित्त जखणगाव येथील हटकेश्वर मंदिर येथे व्यसनमुक्तीबाबत विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी पहाटे ५.०० ते ८.०० या वेळेत मोफत महारुद्राभिषेक व व्यसनमुक्तीसाठी प्रसाद रूपाने औषध वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जखणगाव येथील हटकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे रुद्राभिषेक करून श्रद्धेने नतमस्तक झाल्यास व्यसनमुक्ती साध्य होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरामध्ये दर सोमवारी पहाटे व्यसनमुक्तीसाठी रुद्राभिषेक उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमामुळे अनेक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त होण्यास मदत झाल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते.
महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त हा विशेष कार्यक्रम आरोग्य ग्राम, जखणगाव (नगर-कल्याण रोडवर नगरच्या पश्चिमेस सुमारे ११ किमी अंतरावर) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये व्यसनाधीन व्यक्तींसाठी महारुद्राभिषेक तसेच दारू व्यसनमुक्तीसाठी विनामूल्य प्रसाद रूपाने औषध उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कार्यक्रमास येताना पहाटे अंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करणे तसेच सोबत घरातील एक महिला सदस्य (पत्नी / आई / बहीण / मुलगी / थोरली भावजई) घेऊन येणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व व्यसनमुक्त, निरोगी आणि सुखी जीवनासाठी या संधीचा उपयोग करावा, असे आवाहन जखणगाव येथील हटकेश्वर भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra