महाशिवरात्री निमित्त केदारेश्वर देवस्थान बाभुळवाडे येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !

 महाशिवरात्री निमित्त केदारेश्वर देवस्थान बाभुळवाडे येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !


प्रतिनिधी : श्रीकांत चौरे पारनेर

बाभुळवाडे, ता. पारनेर येथे पवित्र महाशिवरात्री निमित्त स्वयंभू श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थान, बाभुळवाडे येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परिसरातील तसेच इतर भागातील सर्व शिवभक्तांसाठी हा उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.

         महाशिवरात्री ही भगवान शंकरांना समर्पित पवित्र रात्र असून या दिवशी उपवास, जप, अभिषेक व अखंड नामस्मरण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीमार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

        कार्यक्रमानुसार रात्री १२.०० ते सकाळी ६.०० या वेळेत अभिषेक, आरती व रुद्राभिषेक होणार आहे. सकाळी ७.०० वाजल्यापासून दिवसभर श्रींचे दर्शन सुरू राहील. सायंकाळी ३.०० ते ७.०० या वेळेत श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रात्री ९.०० वाजल्यापासून पुन्हा अभिषेक करण्यात येणार आहे.

            या कार्यक्रमास सर्व शिवभक्त, ग्रामस्थ व भाविकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करावी, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन समाजात धार्मिक एकोपा व अध्यात्मिक जागृती वाढण्यास मदत होणार आहे.


शिवकृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य व शांती लाभो, हीच प्रार्थना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments