अहिल्यानगर–पुणे रेल्वे सेवांचा मुद्दा संसदेत खा.नीलेश लंके यांनी वेधले लक्ष !
वंदे भारत व मेंटनन्स डेपोबाबत सकारात्मक संकेत !
अहिल्यानगर : प्रतिनिधी
खासदार नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेत अहिल्यानगर–पुणे दरम्यान रेल्वे सेवांच्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. अहिल्यानगर हे मुंबई व पुणे जिल्ह्यांना जोडणारे औद्योगिक व ऐतिहासिक केंद्र असून, येथून दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिक पुणे व मुंबईकडे ये-जा करतात. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अहिल्यानगर–पुणे दरम्यान नवीन वंदे भारत किंवा इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सरकारचा विचार आहे का, अशी विचारणा त्यांनी केली.
खा. लंके यांनी पुढे वंदे भारत स्लिपर कोच संदर्भात प्रश्न उपस्थित करत, अहिल्यानगरहून दिल्ली किंवा जम्मूसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर नव्या स्लिपर गाड्या सुरू करून त्यांचा थांबा अहिल्यानगर येथे देण्याचा सरकारचा विचार आहे का, असे विचारले. तसेच वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वे सेवांची संख्या वाढत असताना त्यांच्या तांत्रिक देखभालीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबतही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र असल्याने येथे वंदे भारतसाठी स्वतंत्र मेंटनन्स डेपो स्थापन करण्याबाबत सरकार विचार करत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रेल्वेतील खानपान व इतर सेवांमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक पदार्थांचा समावेश तसेच स्थानिक बचत गट व सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देण्यासाठी विशेष धोरण तयार केले जाणार का, याचीही मागणी खा. लंके यांनी केली.
या सर्व प्रश्नांना उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, खासदार नीलेश लंके यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेण्यात आली असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रासाठी यंदा रेल्वे विकासासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सुमारे १ लाख कोटी रुपयांचे विविध रेल्वे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. पुणे रेल्वे विभागासह राज्यातील अनेक स्थानकांची क्षमता दुप्पट करण्याचे काम वेगात सुरू असून, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच अहिल्यानगरमध्येही रेल्वे पायाभूत सुविधांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra