पारनेरच्या पाणीपुरवठा सभापती पदाला न्याय देत,पाणी योजनेपासून नागरी सुविधांपर्यंत योगदान देणाऱ्या योगेश मते यांचा अनोखा उपक्रम !
स्वखर्चाने केले पारनेरमध्ये २०० सार्वजनिक बाकांचे लोकार्पण !
पारनेर : प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग यांचा मिलाफ साधत पारनेर शहरात नगरसेवक योगेश मते यांच्या वतीने तब्बल २०० सार्वजनिक बाक बसविण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उदाहरण असल्याचे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
खा. लंके म्हणाले, पारनेर ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकीर्द सुरू करून नगरपंचायत नगरसेवक पदापर्यंतचा प्रवास करताना योगेश मते यांनी शहरातील प्रत्येक प्रश्न स्वतःचा समजून हाताळला. पाणी, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, धार्मिक स्थळांवरील सोयीसुविधा अशा विविध विषयांवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले.“शहराच्या विकासाचा प्रश्न असो किंवा नागरिकांच्या दैनंदिन अडचणी मते नेहमी आघाडीवर असतात. त्यांचा निस्वार्थ सेवाभाव इतर लोकप्रतिनिधींसाठी आदर्श आहे,” असे लंके यांनी नमूद केले.
पारनेरच्या पाणीटंचाईचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी शाश्वत पाणी योजना राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी मते यांनी स्वीकारली. सहकारी नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी आराखडा पूर्ण केला. तांत्रिक मंजुरीसाठी नगरपंचायतीमार्फत शासनाकडे ७३ लाख रुपये जमा करण्यात आले असून अंतिम सहीसाठी प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे. “या योजनेचे श्रेय मते व त्यांच्या सहकारी नगरसेवकांचेच आहे,” असे लंके यांनी स्पष्ट केले.
मते एकटे काम न करता सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतात. त्यामुळे प्रभागनिहाय कामांना गती मिळते. “लोकप्रतिनिधीने स्वतः पुढाकार घेतल्यास संपूर्ण टीम प्रेरित होते. पारनेरमध्ये ते चित्र दिसते,” असे लंके म्हणाले. भविष्यातही ही टीम नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
▪️चौकट
नागरिकांच्या मागणीतून ‘बाकांची’ सोय
योगेश मते म्हणाले, धार्मिक स्थळे, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व महिलांना बसण्यासाठी सोय नसल्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे स्वखर्चातून बाक उपलब्ध करून ते सर्व प्रभागांमध्ये बसविण्याचा निर्णय घेतला. “वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजोपयोगी काम व्हावे, हा उद्देश आहे. पुढेही नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका राहील,” असे त्यांनी सांगितले.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra