बाजार समितीच्या सभापतीपदी किसनराव रासकर तर उपसभापतीपदी शिवसेनेचे किसनराव सुपेकर !
साधी राहणीमान आसनाऱ्या अभ्यासू चेहऱ्यांना खा.लंके यांनी दिली संधी!
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी किसनराव रासकर तर उपसभापतीपदी शिवसेनेचे किसनराव सुपेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी पुरस्कृत खा.नीलेश लंके व विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व जागा जिंकत भाजपा पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडविला होता. त्यावेळी पदाधिकारी निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांना सभापतीपदाची संधी देण्यात आली. उपसभापतीपदी नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिर्के यांची वर्णी लावण्यात आली. दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विकास जाधव यांनी सोमवारी संचालक मंडळाची विशेष सभा बोलविली होती. या सभेत दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस मावळते सभापती बाबाजी तरटे, मावळते उपसभापती बापूसाहेब शिर्के, ज्येष्ठ संचालक गंगाराम बेलकर, अशोक कटारिया, डॉ. आबासाहेब खोडदे, रामदास भोसले, संदीप सालके, डॉ. पद्मजा पठारे, किसनराव रासकर, किसनराव सुपेकर, मेघा रोकडे, बाबासाहेब नऱ्हे, विजय पवार, चंदन भळगट, तुकाराम चव्हाण हे १८ पैकी १५ संचालक उपस्थित होते. सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक आर.एस.चाबुकस्वार, आर.पी.आगरकर तसेच बाजार समितीचे सचिव सुरेश आढाव यांनी अध्यासी अधिकारी विकास जाधव यांना सहाय्य केले.
▪️चौकट
निष्ठेला न्याय !
पाच वर्षे पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम पाहिलेले किसनराव रासकर हे सन १९८० पासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत रासकर यांनी खा.नीलेश लंके व राणी लंके यांच्या प्रचाराची धुरा प्रामाणिकपणे सांभाळली होती.समता परिषदेचे तालुकाध्यक्ष असलेले किसनराव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचेही पदाधिकारी आहेत. जवळा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच तसेच सेवा संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.खासदार नीलेश लंके यांनी किसनराव यांच्या निष्ठेला न्याय देत उतरत्या वयात सभपतीसारख्या मोठया पदावर काम करण्याची संधी त्यांना दिली आहे.
▪️चौकट
निष्ठावान शिवसैनिकाला संधी !
स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या किसनराव सुपेकर यांनी पंधरा वर्षे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमनपद भुषविलेले आहे. सन २००४ मध्ये ते बाजार समितीचे संचालकही होते. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने नगर येथील यश पॅलेसमध्ये खा.नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खा. लंके यांनी किसनराव सुपेकर यांना आपण बाजार समितीमध्ये सभापतीपद किंवा उपसभापतीपद देणार असल्याचे जाहिर केले होते.किसनराव यांनी पदाची अपेक्षाही ठेवलेली नसताना त्यांच्या निष्ठेला न्याय देण्याची माझी जबाबदारी असल्याचे खा.लंके यांनी त्यावेळी सांगितले होते.त्यावेळी दिलेला शब्द पाळून खा. लंके यांनी शब्द पाळल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.
▪️चौकट
मावळते सभापती, उपसभापती सुचक अनुमोदक !
मावळते सभापती बाबाजी तरटे यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेल्या किसनराव रासकर यांच्या अर्जावर सुचक म्हणून स्वाक्षरी केली तर मावळते उपसभापती बापूसाहेब शिर्के यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
▪️चौकट
उपसभापतींना कटारिया, बेलकर सुचक, अनुमोदक !
उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेल्या किसनराव रासकर यांच्या अर्जावर मा. सभापती अशोकलाल कटारिया यांनी सुचक म्हणून तर मा. सभापती गंगाराम बेलकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra