सद्गुरु किसन बाबा चौरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पारनेर शहरात फुलणार भक्तीचा मळा ! भव्य मिरवणुक व महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांच्या शाहिरीने कडाडणार ढोलकी,डफ तुणतुणे !

 सद्गुरु किसन बाबा चौरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पारनेर शहरात फुलणार भक्तीचा मळा !


भव्य मिरवणुक व महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांच्या शाहिरीने कडाडणार ढोलकी,डफ तुणतुणे !


पारनेर प्रतिनिधी :

        श्री.सत्य अविनाश पारखपद समाज पारनेर आयोजित ,सालाबाद प्रमाणे या ही वर्षी प.पु.सद्गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे ज्येष्ठ नातू व सद्गुरु ब्रह्मनिष्ठ हरिदास महाराज चौरे यांचे चिरंजीव परमपूज्य सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा २१ वा पुण्यतिथी सोहळा पारनेर जामगाव रोड येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठामध्ये गुरुवार दि. २७/०३/२०२५ रोजी संपन्न होत आहे.सद्गुरु विचारांची देवाण-घेवाण होणाऱ्या पारनेर येथील या आत्मज्ञानी गणपत बाबा मठ या ठिकाणी सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडत आहे .

            प.पु.सद्गुरु किसन बाबा चौरे यांचे अध्यात्मिक अधिष्ठान हे वेगळ्या स्वरूपाचे होते.संसारिक जीवन जगत असताना गुरुज्ञानाचा अवलंब करून परमार्थिक सुख कशाप्रकारे अनुभवावे यासाठी सद्गुरुचा साधकाच्या जीवनात कशाप्रकारे लाभ होतो हे किसन बाबांनी आपल्या जीवनात दाखवून दिले आहे.आत्मज्ञानी गणपत बाबांच्या अध्यात्मिक कार्यात आपले आयुष्य घालवून योग साधनेतून आनंदी जीवन कसे जगावे त्या साठी जीवनात सद्गुरु पदाचे महत्त्व काय असते याची जाणीव आपल्या शिष्य मंडळांना पटवून दिली आहे.

         समाजातील जातिभेद अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती मोडण्यासाठी त्यांनी आपल्या गुरुपदाचा वापर करून शिष्य गणांना परमार्थिक सुखाची प्राप्ती करून दिली.अहिल्यानगर जिल्ह्यसह कोल्हापूर ,सातारा , सांगली ,पुणे या सह महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरी बाण्यातून ढोलकी डफ तुनतुन्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व समाज प्रबोधनपर कार्य करणारा सत्य अविनाश पारखपद समाज असून इतर जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त हे पारनेर मध्ये या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने एकत्र जमतात व पारनेरच्या बाजारपेठेतून सद्गुरु प्रतिमेची भव्य मिरवणूकीच्या माध्यमातून अध्यात्मिक भेदिक भजने व कलगी तुऱ्याचा सामना या लोककलेच्या माध्यमातून पारनेर शहरात पारनेरकरांना अनुभवयास मिळतो.व संपूर्ण पारनेर शहर हे भक्तीमय होऊन जाते.

         या भक्ती सोहळ्यात दुपारी १२ ते ०३ पारखपदी सत्संग ,भेदीक गायन व भजन , ०३ ते ०६ पारनेर शहरातून महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे गायन व शाहिरी जल्लोषात लेझीम व हलगीच्या निनादात सद्गुरू प्रतीमांची भव्य मिरवणूक निघणार असून,सायं. ०७ वा.सद्गुरू पादुकांची महापुजा व तद्नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे . तसेच रात्री ९ ते पहाटेपर्यंत नामवंत शाहीरांचा भेदिक भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

आत्मज्ञानी गणपत बाबा मठ,जामगाव रोड,पारनेर येथे सदर कार्यक्रमास उपस्थित राहून परमार्थिक सुखाचा लाभ घ्यावा,असे आवाहन प.पू.सद्गुरु बबनदादा चौरे व समस्त सत्य अविनाश पारख पद समाज पारनेर यांच्या कडून करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments