ज्ञानेश्वरीचे अभ्यासक व अध्यात्माचे उपासक हरपले !

 ज्ञानेश्वरीचे अभ्यासक व अध्यात्माचे उपासक हरपले !

वडनेर येथील मारुती सोनुळे (माऊली बाबा) काळाच्या पडद्याआड !


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

           पारनेर तालुक्यांची भूमी ही थोर साधू संतांची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे.अध्यात्मिक विचारांचे पाईक असणाऱ्या या पवित्र भूमितील अध्यात्माचा व भक्तिमार्गाचा वारकरी म्हणून व विश्वाची माऊली आसणारे ज्ञानेश्वर महाराज लिखीत संपूर्ण ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी तोंडपाठ असणारे व त्या ज्ञानाच्या सरोवरात चिंब भिजून आयुष्यभर ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार करत अखंडित ज्ञानदान करनारे अध्यात्माचे अभ्यासक ,वडनेर या छोट्याशा गावात भव्य मंदिर उभारून अखंडित ज्ञानदान करनारे , परमार्थिक भूषण ह.भ.प.गुरुवर्य मारुती सावळेराम सोनुळे ( माऊली बाबा ) यांनी वयाचे शतक पुर्ण करत मंगळवार दि.१८ मार्च रोजी वयाच्या १०० व्या वर्षी वैकुंठ गमन झाले आहे.

         संत परंपरेचा व आध्यात्मिक विचारांचा पगडा बालवयातच माऊली बाबा सोनुळे यांच्यावर पडला होता .अध्यात्मिक विचारांवर तडजोड न करता गेले अनेक दशके कुठलेही पादत्राणे न घालता अनवाणी भटकंती करत ,घोंगडी व्यवसायाच्या माध्यमातून घोंगडीवाले बाबा म्हणून प्रचलित असणारे व या व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण तालुकाभर मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक परिवार निर्माण करणाऱ्या या संत रूपाला पोहोचलेल्या माऊली महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन हे कष्टमय व संघर्षात घालविले .

           बारा ज्योतिर्लिंगांची भूमी असणाऱ्या पारनेर शहरात व तालुक्यातील अनेक जागृत देवस्थानांच्या सुशोभीकरणासाठी किंवा मंदिर उभारणीसाठी नेहमीच मोलाचे योगदान असणाऱ्या माऊली बाबा यांनी वडनेर येथे एक विशाल मंदिराची उभारणी केली आहे.अनेक दशके संपूर्ण देशभरातून अनेक भक्तगण त्यांच्या दर्शनाला वडनेर या ठिकाणी येत माऊली बाबांचे दर्शन व आध्यात्मिक सुखाचा लाभ घेत असे.अध्यात्मिक ध्येयवेडे आसनाऱ्या या माऊली बाबांनी मंदिराच्या सर्व भिंती या संगमरवरी दगडात उभ्या करायच्या व त्यावर संपूर्ण ज्ञानेश्वरी लिखाण करायचे हा मानस ठेवून हे मंदिर उभारले .त्यात बऱ्यापैकी त्यांचा हा मानस पूर्णत्वासही गेला आहे.भक्तगणांकडून मिळालेल्या दानाचा एक रुपयाही कुटुंबासाठी न लावता मंदिराची उभारणी करण्यात माऊली बाबांनी संपूर्ण हयात घालवली.मंदिराचे राहीलेले अधुरे कार्य त्यांचा परिवार , भक्तगण व ग्रामस्थांनी पूर्णात्वास न्यावे ही ईच्छा माऊली बाबांनी मरणापूर्वी व्यक्त केली आहे .आपल्या कुटुंबाजवळ किंवा भक्त परिवारासमोर त्यांनी या मंदिराच्या बाजूलाच मी जिवंत समाधी घेणार असे भाकीत केले होते . ते स्वप्न त्यांचे अधोरेच राहीले गेले.अशा या अध्यात्मिक व धार्मिक वारकऱ्याच्या अकस्मात जाण्याने अध्यात्म व वारकरी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे .

Post a Comment

0 Comments