तमाशा कलावंतांसाठी सांस्कृतिक मंत्र्यांना भेटणार !
खासदार नीलेश लंके यांची माहिती !
अहिल्यानगर: प्रतिनिधी
महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या आखत्यारीतील काही मागण्या असून त्यासंदर्भात खा. शरद पवार यांच्या माध्यमातून आपणासह शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे केंद्रीय सांस्कृतीक मंत्र्यांची भेट घेऊन या मागण्यांची तड लावणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून गड, किल्ले संवर्धन मोहिम हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ रविवारी किल्ले शिवनेरी येथे झाला. या मोहिमेवरून परतताना खा. लंके यांनी नारायणगांव येथील तमाशा पंढरीस भेट देऊन तेथील कलाकरांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना खा लंके म्हणाले, केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे कलावंतांच्या काही मागण्या आहेत. तमाशा कलावंतांना पॅकेज मिळाले पाहिजे ही एक मागणी आहे. सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या विभागाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व मी शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतीक मंत्र्यांसमवेत लवकरात लवकर बैठक घेणार आहोत. त्यासाठी तमाशा कलावंतांच्या शिष्टमंडळालाही बोलविण्यात येणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
तमाशा जिवंत राहिला पाहिजे !
तमाशा ही लोककला लोप पावत चालली आहे. ही पारंपारिक लोककला जिवंत राहिली पाहीजे असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे मत आहे. तमाशा कलावंत आणि माझं आपुलकीचं नाते असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
कोव्हीड सेंटरमध्ये मनोरंजन !
ज्यावेळी कोव्हीडची महामारी आली, त्यावेळी याच तमाशा कलावंतांनी आमच्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन अनेक रूग्णांना कोरोनातून बाहेर काढले. तमाशा कलावंतांच्या व्यथा, अडीअडचणी मला माहीती असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
तमाशाच्या वाहनांना टोल नको !
तमाशा कलावंतांच्या वाहनांकडून टोल आकारला जाऊ नये ही छोटीशी मागणी आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी आपण आग्रही असतो तशीच भूमिका तमाशा कलावंतांसाठीही असल्याचे खा. लंके यांनी स्पष्ट केले.
▪️चौकट
कलावंतांना आयुष्यभर मान-सन्मान मिळावा !
कलावंतांना कसा न्याय देता येईल यासाठी आपण आग्रही आहोत. कलावंतांचे मानधही मिळत नाही. कलाकाराचे ठराविक वय असते. त्या वयापलीकडे गेल्यानंतर या कलाकारांवर कधी-कधी उपासमारीची वेळ येते. ठराविक वयात कलाकाराला जो मान-सन्मान मिळतो तो त्याला आयुष्यभर मिळाला पाहिजे. त्यासाठी खास उपाययोजना झाली पाहिजे ही माझी भूमिका आहे.
खासदार नीलेश लंके ( लोकसभा सदस्य )
▪️चौकट
कलावंतांच्या प्रश्नाकडे लक्ष
देण्यासाठी सरकारला वेळ नाही !
कलाकारांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळत नाही. मागील आठवडयात कलावंतांच्या मानधनाबाबत आपण संबंधित मंत्र्यांना पत्र दिले आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही.
▪️चौकट
खा. लंके यांनी महिनाभराचे धान्य दिले !
खा. नीलेश लंके यांनी कोरोना बाधित रूग्णांसाठी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले होते. या आरोग्य मंदिराचा देशात नव्हे तर जगात बोलबाला झाला. हे आरोग्य मंदिर पाहण्यासाठी आम्ही गेलो असता तिथे खा. नीलेश लंके हे मोकळेपणाने फिरून कोरोना रूग्णांना धीर देत होते. आमच्यासोबतच्या तमाशा कलावंतांनी रूग्णांसाठी कला सादर केली. कार्यक्रमानंतर प्रत्येक कलाकाराला खा. लंके यांनी महिनाभर पुरेल इतके धान्य दिले. यावरून खा. लंके यांना तमाशा कलावंतांविषयी किती आस्था आहे याची कल्पना येते.
संभाजीराजे जाधव (अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद )

0 Comments
Jansamvad News covers latest marathi news (Tajya Batmya), live updates, online from Mumbai, pune, satara, Kolhapur, Solapur, Sangli,Nashik,thane, Raigad, kokan, west Maharashtra, nagpur and all Maharashtra