खा.लंके यांची केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक !

खा.लंके यांनी लक्ष वेधताच दिल्लीचे अधिकारी पारनेरात दाखल ! 

रखडलेल्या सिंगल फेज योजनेच्या ठेकेदाराकडून तातडीने काम करण्याची हमी घेत,ठेकेदाराकडून कुचराई झाल्यास त्याच्यावर होणार कारवाही ?


पारनेर : प्रतिनिधी 

     ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना २४ तास वीज मिळावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या आरडीएसएस सिंगल फेज योजनेचे काम पुर्ण करण्यात होत असलेल्या दिरंगाईसंदर्भात खा. नीलेश लंके यांनी गेल्या आठवडयात उर्जा समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करताना केंद्रीय उर्जा समितीच्या अधिकाऱ्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे धाव घेत या योजनेच्या कामाचा आढावा घेतला.  

     केंद्रीय उर्जा समितीचे सदस्य असलेल्या खासदार नीलेश लंके यांनी समितीच्या बैठकीत सिंगल फेज योजना व एकूणच महावितरणच्या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबात प्रश्न उपस्थित करत तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. खा. लंके यांच्या नाराजीची तात्काळ दखल घेत केंद्रीय उर्जा विभागाचे वरीष्ठ अधिकारी नगरमध्ये दाखल झाले. महावितरणच्या जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांना घेऊन ते पारनेरमध्ये दाखल झाले. खा. नीलेश लंके यांच्यासमवेत बैठक घेत विशेषतः सिंगल फेज योजनेसंदर्भात आढावा घेण्यात आला. या प्रश्नासंदर्भात दिल्ली येथे सबंधित ठेकेदाराच्या उपास्थितीत बैठक घेण्यात येऊन ठोस निर्णय घेण्याची ग्वाही केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांस अधीक्षक अभियंता रमेश पवार, अधीक्षक अभियंता आराखडा श्री ढोबळे, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, उपभियंता हतोळकर यांच्यासह दिल्लीच्या पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. 

▪️चौकट

ठेकेदाराकडे क्षमता नाही !

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आरडीएसएस योजेअंतर्गत सिगल फेज योजना राबविण्यासाठी ७०० ते ८०० कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी या योजनेची निविदा मंजुर झाली. मात्र हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे पुरेसे मनुष्यबळ अथवा सामग्रीही नसल्याने हे काम रेंगाळल्याची माहीती आहे.


▪️चौकट

 दिल्लीत पुन्हा बैठक !

सिंगल फेज योजनेच्या प्रश्नावर दिल्ली येथे ठेकेदाराच्या उपास्थितीत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत ठेकेदाराकडून तातडीने काम करण्याची हमी घेण्यात येईल, ठेकेदाराकडून त्यात कुचराई झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेही या बैठकीत केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 


▪️चौकट

 शेती पंपांना दिवसा वीज हवी ! 

महावितरणकडून शेती पंपांसाठी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करण्यात येतो. अहिल्यानगर मतदारसंघातील अनेक भागात बिबटया तसेच अन्य वन्य प्राण्यांची संख्या मोठी असून त्यांच्यापासून शेतकऱ्यांना धोका आहे. त्यासाठी शेतीपंपांना आठवडाभर रात्रीऐवजी दिवसा काही काळ वीज पुरवठा करता येईल का याची चाचपणी करण्याच्या सुचना खा. लंके यांनी यावेळी केल्या. तसेच सिंगल फेज योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कामाचा वेग वाढविला नाही तर त्यास ब्लॅक लिस्ट करण्यात यावे असेही लंके यांनी सुचित केले.   


▪️चौकट

मी शेतकऱ्यांच्या पाठीशी !   

वीज आणि शेतकरी यांचे नाते जवळचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यासाठी महावितरणच्या कामामध्ये गती यावी आणि शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.    

खासदार नीलेश लंके (लोकसभा सदस्य )